मुंबई,
Heat wave in Maharashtra उत्तरेकडील वाऱ्यांचा वेग कमी होताच महाराष्ट्राच्या हवामानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसू लागले आहेत. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये शीतलहरींचा प्रभाव घटल्याने मैदानी भागांत कमाल तापमान वाढले असून, पर्वतीय प्रदेशांमध्ये हिमवर्षावाला विराम मिळाल्याने गारठा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. या बदललेल्या वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रावरही जाणवत असून, राज्यात कमाल आणि किमान तापमानात सातत्याने बदल सुरू आहेत. देशभर पसरलेल्या धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे, तर दक्षिण भारतात सुरू असलेल्या पावसामुळे तापमानात अनपेक्षित घसर- वाढ होत आहे.
महाराष्ट्रात हवा प्रामुख्याने कोरडी राहणार असल्याने थंडीचा कडाका लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. उत्तरेकडील वाऱ्यांची तीव्रता कमी झाल्याने वातावरण ढगाळ होत असून पावसाला अनुकूल स्थिती तयार होताना दिसत आहे. पुढील २४ तासांत राज्यात थंडी कमी जाणवेल, तर दुपारी उकाडा वाढल्याची जाणीव होईल. विशेषतः किनारपट्टी भागांत दमट उष्णतेचा परिणाम अधिक दिसेल. हवामानातील या अचानक बदलांचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत नागरिकांना सर्दी, पडसं किंवा उष्माघातासारख्या त्रासांपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात काही भागांत तापमान ६ ते ७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले होते. मात्र आता राज्यातील नीचांकी तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत वाढले असून धुळे येथे अशी नोंद करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर या भागांतही पुढील काळात तापमान वाढीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, मलाक्का सामुद्रधुनी आणि अंदमान समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील दोन दिवसांत बंगालच्या उपसागरात चक्रीय परिस्थिती उद्भवू शकते. २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान अंदमान-निकोबार बेटांवर मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच तामिळनाडू, माहे आणि केरळमध्ये २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या काळात सागरी किनाऱ्यांवरील वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी पर्यंत वाढू शकतो, त्यामुळे किनारी भागातील नागरिक आणि मासेमारांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या थोडी उब वाढली असली तरी पुढील ४८ तासांनंतर गारठा पुन्हा वाढण्याची चिन्हं हवामान विभागाने व्यक्त केली आहेत. हिमालयीन प्रदेशात सुरुवातीचे बदल दिसू लागल्यानंतर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि पूर्वोत्तर भारतात पुन्हा थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. एकूणच महाराष्ट्रात सध्या थंडीची तीव्रता घटली असली तरी हवामानातील हे जलद बदल पुढील काही दिवस अनिश्चित वातावरण निर्माण करू शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेत हवामानातील बदलांसाठी सज्ज राहण्याची गरज आहे.