चंद्रपूर,
tiger attack सरपण गोळा करण्याकरिता गावाजवळी झुडपी जंगलात गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ल्ला करून ठार केले. ही घटना रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास पायली-भटाळी बीटातील वन कक्ष क्रमांक 800 मध्ये उघडकीस आली. बाबा गेडाम (54, रा. चिंचोली) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
चिंचोली येथील बाबा गेडाम हे रोजंदारी मजूर म्हणून कामी करीत होते. सध्या थंडीचे दिवस असल्याने रविवारी सकाळी 10 वाजता गेडाम हे सरपण गोळा करण्यासाठी गावातील झुडपी भागातील पायली-भटाळी बीटातील वन कक्ष क्रमांक 800 मध्ये गेले होते. त्याठिकाणी सरपण गोळा करीत असताना वाघाने अचानक गेडाम यांच्यावर हल्ला करीत त्यांना जंगलाच्या दिशेने फरफटत नेले. गेडाम हे सायकलने जंगलाच्या दिशेने गेले होते. सायंकाळी गेडाम यांचे कुटुंब कामावरून घरी परतले, मात्र बाबा गेडाम घरी न आल्याने कुटुंबाने शोधाशोध सुरु केली. मात्र त्यांचा काही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना सोबत घेत जंगलाच्या दिशेने निघाले असता त्यांना गेडाम यांची सायकल व त्याठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले. याबाबत दुर्गापूर पोलिस व वनविभागाला नागरिकांनी माहिती दिली.tiger attack काही वेळात वनविभाग व पोलिसांची चमू त्याठिकाणी दाखल झाली. गेडाम यांचा शोध घेण्यासाठी सर्वानी जंगलाच्या दिशेने मोर्चा वळविला असता, गेडाम यांची कुर्हाड, चप्पल व रक्ताने माखलेले कपडे आढळून आले, रात्री 11 वाजता गेडाम यांच्या मृतदेहाचे तुकडे, हाथ त्यानंतर छिन्नविछिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेहाचा खाल्लेला भाग आढळून आला. गेडाम यांचा मृतदेह मिळाल्यावर नागरिकांचा वनविभागवर रोष उफाळून आला, रात्रीपासून गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.