निवडणुकीच्या धुमाकूळीत नाना पटोले भाजपा नेत्याच्या भेटीला

    दिनांक :24-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Nana Patole meets BJP leader निवडणुकीच्या धुमाकूळात राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथी घडण्याची शक्यता उभी राहिली आहे. नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारीच्या तणावामुळे भाजपामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. काही पदाधिकाऱ्यांनी तर राजीनाम्याचा विचारही मांडला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेश सदस्य आणि मुस्लिम समाजाचे नेते आबिद सिद्दिकी यांची त्यांच्या घरी भेट घेतली. भेटीमागे आबिद सिद्दिकी यांच्या प्रकृतीची विचारपूस असल्याचे सांगितले जात असले, तरी राजकीय वर्तुळात या भेटीमागे मोठ्या उलथापालथीची शक्यता असू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
 
 

nana patole 
 
याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही लक्ष केंद्रित झाले आहे. मुनगंटीवार यांनी आपल्या प्रचार सभेत ज्या वॉर्डात काँग्रेसचा नगरसेवक निवडून येईल, त्या वॉर्डात बोर्ड लावून त्या नागरिकांनी काँग्रेसकडून विकास मागावा, असे वक्तव्य केले. या वक्तव्यास काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता समर्थ यांनी प्रत्युत्तर दिले की, मुनगंटीवार यांनी जनतेला धमकावले, यातच आमचा विजय आहे. तर भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रा. किरण कापगते यांनी सांगितले की, मुनगंटीवार यांच्या विकास कामांमुळे मूल शहराचा विकास झाला आहे आणि त्यामुळे जनता भाजपालाच निवडून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढत अधिकच लक्षवेधी ठरली आहे.