इस्लामाबाद,
PML-N's dominance in Pakistan पाकिस्तानातील पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी पीएमएल-एनने प्रचंड वर्चस्व सिद्ध करत दणदणीत विजय मिळवला आहे. अनधिकृत निकालांनुसार, पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजने एकूण १३ पैकी तब्बल १२ जागा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. सहा राष्ट्रीय असेंब्ली जागा आणि पंजाब प्रांतीय असेंब्लीच्या सात जागांसाठी मतदान झाले होते. हरिपूरमधील एक राष्ट्रीय असेंब्ली जागा वगळता उर्वरित सर्व जागा पंजाब प्रांतातील होत्या आणि या सर्वांवर पीएमएल-एनने वर्चस्व मिळवले.
ज्या सहा राष्ट्रीय असेंब्ली जागांसाठी निवडणूक झाली त्यात हरिपूरमधील एनए-१८, फैसलाबादमधील एनए-९६ आणि एनए-१०४, लाहोरमधील एनए-१२९, साहिवालमधील एनए-१४३ आणि डेरा गाझी खानमधील एनए-१८५ यांचा समावेश होता. तर पंजाब विधानसभेच्या सात जागांमध्ये सरगोधा (पीपी-७३), मियांवाली (पीपी-८७), फैसलाबाद (पीपी-९८, ११५, ११६), साहिवाल (पीपी-२०३) आणि मुझफ्फरगढ (पीपी-२६९) या मतदारसंघांचा समावेश होता. अनधिकृत निकालांनुसार मुझफ्फरगढमधील एकमेव जागा पीएमएल-एनच्या हातातून निसटली आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीने ती जिंकली. पीपी-२६९ या मतदारसंघात पीपीपीचे मियां आलमदार अब्बास कुरेशी यांनी ५५,८६८ मतांनी आघाडी घेत विजयी ठरले, तर अपक्ष उमेदवार मोहम्मद इक्बाल खान पिताफी दुसऱ्या क्रमांकावर होते.
या पोटनिवडणुका ९ मे रोजी झालेल्या हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांत दोषी ठरवलेल्या पीटीआयच्या अनेक आमदारांना अपात्र ठरवल्यानंतर घेण्यात आल्या. मुख्य विरोधी पक्ष पीटीआयने बहुतांश ठिकाणी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतलाच नाही. मतदान शांततेत पार पडले, मात्र टक्केवारी तुलनेने कमी होती. निकाल स्पष्ट होताच पीएमएल-एनचे समर्थक खुशीने रस्त्यावर उतरले, मिठाईचे वाटप केले आणि फटाके फोडून आपला विजय जल्लोषात साजरा केला.