'ही कसोटी नाही, संगीत खुर्ची!'

रवी शास्त्रींचा टीम इंडियावर हल्लाबोल

    दिनांक :24-Nov-2025
Total Views |
गुवाहाटी,
Ravi Shastri's attack on Team India गुवाहाटीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा फलंदाजी क्रम कोसळल्यानंतर माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा संताप उसळला आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळात दक्षिण आफ्रिकेच्या ४८९ धावांना प्रत्युत्तर देताना भारताने ९ धावांपासून पुढे खेळ सुरू केला. सुरुवातीस केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी संयमी खेळ केला, कारण खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळत होती. मात्र काही वेळाने सोपी वाटणाऱ्या या पट्टीवर भारतीय डाव अचानकपणे गडगडला.
 
 
 
Ravi Shastri
 
टीम इंडियाची अवस्था बिनबाद ६५ वरून ७ बाद १२२ अशी झाली. अवघ्या ५७ धावांत सात महत्त्वाची विकेट्स गमावल्याने भारताची फलंदाजी अक्षरशः पत्त्याचा बंगला ठरली. अनेक खेळाडूंनी निष्काळजीपणे विकेट फेकल्याने संघ अडचणीत सापडला. या नाट्यमय पडझडीदरम्यान कॉमेंट्री करताना रवी शास्त्री यांनी संघ व्यवस्थापनावर थेट टीका केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की या खेळपट्टीवर इतकी मोठी पडझड होण्यासारखे काहीच नव्हते, परंतु सतत केले जाणारे फलंदाजी क्रमातील अनावश्यक प्रयोग संघाला महागात पडत आहेत.
 
 
आपल्या आक्रमक शैलीत बोलताना शास्त्री म्हणाले, "ही फलंदाजी नाही, हा तर संगीत खुर्चीचा खेळ आहे." सतत बदलणाऱ्या क्रमामुळे खेळाडूंमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. व्यवस्थापनाने या मालिकेचा आढावा घेताना काही खेळाडूंच्या निवडीवर गंभीरपणे विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला. शास्त्री यांनी पूर्वीच्या सामन्यांचे उदाहरण देत म्हटले की कोलकात्यात चार फिरकीपटू खेळवले, पण त्यापैकी एका गोलंदाजाला फक्त एक ओव्हर मिळाली. त्या ठिकाणी एका अतिरिक्त फलंदाजाची गरज होती. तसेच वॉशिंग्टन सुंदरला मागील कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर पाठवले, मात्र गुवाहाटीत त्याला थेट आठव्या स्थानावर ढकलण्यात आले. "सुंदर हा नंबर ८ चा खेळाडू नाही. त्याला त्याच्या क्षमतेनुसार वरच्या क्रमांकावर खेळवायला हवे," असे ते म्हणाले.
 
नंबर ३ च्या स्थानावरील सततच्या बदलांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा यांच्यानंतर या जागेवर सातत्य राहत नसल्याचे त्यांनी सांगितले. करुण नायर, साई सुदर्शन यांना संधी मिळत असताना अचानक बदल करण्यात आल्याने गोंधळ वाढल्याचे त्यांनी नमूद केले. कोलकात्यात सुंदरला नंबर ३ वर आणल्यानंतर गुवाहाटीत पुन्हा सुदर्शनला त्या जागी पाठवण्यात आले. "प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सर्वप्रथम जे करणे आवश्यक आहे ते म्हणजे संघाची बॅटिंग ऑर्डर निश्चित करणे," असा सल्ला शास्त्री यांनी ठामपणे नोंदवला.