तेनकासी,
Tenkasi bus accident तामिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. इडाईकल गावाजवळ दोन खाजगी बसेसची समोरासमोर धडकल्या. अपघातानंतर काही प्रवासी बसमध्ये अडकले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि स्थानिकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार मदुराईहून सेनकोट्टईकडे जाणारी बस आणि तेनकासीहून कोविलपट्टीकडे जाणारी बस एकमेकांना धडकली. यापैकी एका बसचा चालक अतिवेगात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि रस्त्यावरील चिन्हांची तपासणी करत आहेत. घटनेनंतर तेनकासी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मृत आणि जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांची रुग्णालयाबाहेर गर्दी झाली आहे. स्थानिक प्रशासनाने तत्काळ मदतकेंद्र उभारून कुटुंबीयांना आवश्यक माहिती, मदत आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.