वाघाने केला स्कूल व्हॅनचा पाठलाग

‘त्या’ वाघांना स्थलांतरित करा शेतकर्‍यांचा ठिय्या

    दिनांक :24-Nov-2025
Total Views |
समुद्रपूर,
tiger attack गिरड परिसरात वाघांची दहशत कायम असल्याने शेतशिवारात मजूर काम करण्यास येत नसल्याने शेतीची कामं खोळंबली आहेत. याशिवाय आता स्कूल व्हॅनचाही वाघाने पाठलाग गेल्याची माहिती पुढे आल्याने गिरड,—खुर्सापार परिसरातील पाचही वाघांचे दुसर्‍या जंगलात स्थलांतरण करण्यात यावे या मागणीसाठी गिरड वनविभागाच्या कार्यालयात शेतकर्‍यांनी तासभर ठिय्या आंदोलन करून वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांच्यासमोर गार्‍हाणे मांडले.
 

tiger attack 
गिरड-खुर्सापार मार्गावर वाघांचा वावर वाढला असून वाहनचालक आणि प्रवाशीही धास्तावले आहेत. सोमवार २४ रोजी सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत आणणार्‍या वाहनाचा वाघाने पाठलाग केल्याची धकादायक घटना घडली. या घटनेची माहिती देत विद्यार्थ्यांनी वनविभागाला निवेदनही दिले. यासंबंधी आ. समीर कुणावार यांना माहिती देताच त्यांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांना दूरध्वनीवरून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. रस्त्याच्या कडेच्या झुडपांची सफाई तातडीने करावी, मार्गावर वन कर्मचारी पथकाची गस्त वाढवावी, शेतीत सुरक्षा व्यवस्था आणि वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावे, अशी मागणीही शेतकर्‍यांनी केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी गावंडे यांनी वाघ जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. वाघीण व तीन पिलांना पकडण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविल्याची माहिती दिली. मात्र, आंदोलकांनी छोट्या जंगलात वाघांचे वास्तव्य नेहमीच समस्या असल्याने त्यांचे स्थलांतरणच हा एकमेव उपाय असल्याचा आग्रह धरला.