विलास नवघरे
समुद्रपूर,
Khursapar tiger family तालुयातील गिरड-खुर्सापार परिसरात एक वाघीण, तीन पिल्लं व एक वाघ अश्या ५ वाघांनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे. दररोज या वाघांचे नागरिकांना दर्शन होत आहे. यातील कुटुंबप्रमुख वाघाला ३० डिसेंबरला जेरबंद करण्याची परवानगी वनविभागाला मिळाली आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार्या या वाघांची मौज मस्ती अनेक नागरिकांनी खुर्सापार परिसरात पाहिले. वाघिणीचे तीन पिल्लं एका झाडावर चढून चांगलीच मौज मस्ती करीत असल्याचे दिसून आले. हे दृश्य पाहून अनेकांनी आनंद व्यत केला असला तरी या वाघांच्या दहशतीमुळे शेतकरी, शेतमजूर चांगलेच धास्तावले आहेत.
गिरड-खुर्सापार परिसरात पाच वाघांची दहशत कायम आहे. या वाघांनी आतापर्यंत ३० च्या वर जनावरांना भक्ष्य केले आहे. नागरिकांनी वनविभागाच्या कार्यालयाला घेराव घालून वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली होती. दरम्यान, यावाघाला जेरबंद करण्याचे आदेश ३० डिसेंबरला मिळाली. वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी दिवसरात्र या वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. स्वत: आमदार समीर कुणावार याकडे बारकाईने लक्ष ठेवून असून ते अधिकार्यांच्या संपर्कात आहे. वाघाला पकडण्यासाठी वापरलेल्या १० जनावरांचा या वाघाने फडशा पाडला. तरीदेखील हा वाघ वनविभागाच्या हाती लागला नाही. वाघ चतूर असून शिकार करताच तो खुर्सापार जंगल सोडून नागपूर जिल्ह्यातील दुसर्या जंगलात पलायन करीत असतो. या वाघांच्या प्रत्येक हालचाली टिपण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले असून दोन ड्रोन कॅमेरे रोज घिरट्या घालत आहे. ५० च्यावर अधिकारी, कर्मचारी वाघाच्या मागावर आहेत. मात्र, हा वाघ वनविभागाला गुंगारा देत आहे.
काही दिवसांपासून गिरड-खुर्सापार मार्गाने येणार्या-जाणार्या नागरिकांना या वाघाच्या कुटुंबाचे दररोज दर्शन होत आहे. कधी रात्री तर कधी दिवसा वाघीण व तिचे तीन पिलं रस्त्यावर बसून झाडावर चढून एकमेकांशी खेळताना दिसतात. आतापर्यंत या वाघांनी ३० च्यावर जनावरांना ठार केले असले तरी अद्याप कोणत्याही मानवाला इजा पोहचवली नाही. ही समाधानाची बाजू असली तरी शेतकरी, शेतमजुरांसह नागरिकांमध्ये दहशत आहे. आता गिरड-खुर्सापार रस्त्यावर दररोज अनेकांना व्याघ्र दर्शन होत असल्याने एकीकडे आनंद तर दुसरीकडे भितीचे वातावरण आहे. सध्या शेतामध्ये रबीची कामे सुरू आहे. मात्र, वाघांच्या भितीमुळे कामांचा खोळंबा होत असल्याने या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.