वर्धेत ‘विचार’ विरुद्ध ‘भावनां’ची लढाई

    दिनांक :24-Nov-2025
Total Views |
प्रफुल्ल व्यास
वर्धा,
Wardha municipal election वर्धेतील नगर पालिका निवडणूक वेगळ्या उंचीवर गेली आहे. ही लढत केवळ उमेदवारांची नाही तर ‘विचार’ विरुद्ध ‘भावना’ या दोन भिन्न प्रवाहांची झाली आहे. एका बाजूला भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रव्यापी दृष्टिकोन, विकास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर कल्पवृक्षाप्रमाणे वर्धेत उभे! तर दुसर्‍या बाजूला शिवसेना आणि काँग्रेसविषयी मतदारांमध्ये थेट जिव्हाळा नसला तरी परस्पर विरोधी विचारांच्या या दोन्ही पक्षातील नगराध्यक्षाच्या उमेदवाराविषयी मतदारांमध्ये भावना जुळलेल्या असल्याचे चित्र शहराचा फेरफटका मारला असता जाणवले.
 
 
 

huk
वर्धा जिल्ह्यात जवळपास साडे तीन वर्ष प्रशासकराज होते. साडे आठ वर्षानंतर नगर पालिकेच्या निवडणुका होत आहेत. याच कालावधीत वर्धेला पहिल्यांदा पालकमंत्रिपद मिळाले. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांचा गोतावळा त्यांच्या आजूबाजूला वाढला. वर्धा महानगर पालिका होईल अशी चर्चा मध्यंतरी रंगात आली होती. दरम्यान, नगर पालिकेच्या निवडणुकांची चाहूल लागल्याने माजी नगरसेवकांसह इच्छूकांच्या महत्त्वाकांक्षा वाढत गेल्या. अनेक जण तिकीट मिळाल्याच्या तोर्‍यातही आले होते. परंतु, जुना, नवा, आतला, बाहेरचा, पक्षातला बाहेरचा असा कोणताही विचार न करता विजय दृष्टीक्षेपात ठेवला असे आज तरी म्हणावे लागेल. युतीमध्ये शिवसेनेकडून आलेल्या प्रस्तावही आल्या पावली परत पाठवल्या गेला. भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ना. डॉ. भोयर यांचे अतिशय विश्वासु तरुणतुर्क निलेश किटे यांना ‘विचारांचे प्रतिनिधी’ बनवले. त्यांच्या प्रचारात भावनेला जागा नाही असे नाही, पण त्याचा केंद्रबिंदू विकास, संघटना आहे. शहराचा विकास, अपुर्ण प्रकल्पांना गती आणि योजनांच्या सातत्यासाठी तसेच पालकमंत्री भोयर यांचा आशीर्वाद या किटे यांच्या जमेच्या बाजू आहेत.
 
 
दुसरीकडे Wardha municipal election शिवसेनेचे रविकांत बालपांडे हे पूर्णपणे भावनिक पातळीवर लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सुरुवातीपासूनच खांद्यावर भगवा दुपट्टा, शिवसेनेची पारंपरिक कार्यकर्त्यांशी असलेली नाळ, आणि स्थानिक पातळीवर निर्माण केलेला आपलेपणाचा भाव‡या सगळ्यामुळे बालपांडे हे म्हणून छाप पाडत आहेत. जुन्या भावनेला बालपांडे कुशलतेने उजाळा देतात. विकासापेक्षा संबंध अधिक प्रभावी ठरते, अशी भावना व्यत केली जात आहे. विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर इतर कोणताही झेंडा हाती न घेता राजकारणातून अलिप्त झाल्यावरील शिवसेनेची काळजी घेतल्याची चर्चा बालपांडे यांच्याविषयी सुरू आहे. शिवाय तेली हा फॅटरही त्यांची जमेची बाजू आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते असल्याने शहराचा विकास करण्यासाठी खाते कामात येण्याचा कयास केला जात असताना पालकमंत्री दुर्लक्षीत करून कसे चालेल. या दोघांमध्ये काँग्रेसचे सुधीर पांगुळ उभे आहेत. काँग्रेसची संघटनात्मक अवस्था कमकुवत असली तरी पांगुळ हे वैयक्तिक भावनिक जुळवत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मतदार पांगुळ यांच्यातील माणूसपणाची चर्चा करीत आहेत. त्यांचा जुना मित्र समीर देशमुख त्यांना मोठे होताना पाहू शकत नसल्याने काँग्रेसमधील काहींना सोबत घेऊन ते पांगुळ यांच्या मागे हात धुवून लागल्यास नवल वाटायला नको.
या तिन्ही उमेदवारांच्या शैलीत एक गोष्ट स्पष्ट दिसते ‡वर्धेची निवडणूक आता पूर्णपणे दोन प्रवाहांची स्पर्धा झाली आहे. वर्धेतील राजकारण ‘कामाचे मूल्य’ आणि ‘भावनेचे आकर्षण’ या दोन टोकांमध्ये आहे. कामाला प्राधान्य देणार्‍याला की मैत्रीचे समीकरण मांडणार्‍यांच्या हाती वर्धा द्यायची अशी चर्चा रंगली आहे.