चिंता वाढवणारी अपघात-मालिका

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
 
वेध
चंद्रकांत लोहाणा
accident रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची स्थिती भारतामध्ये अतिशय चिंताजनक असून, दरवर्षी अपघातांमध्ये लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. रस्ते अपघातांमध्ये जगात भारताचा 11 वा क्रमांक लागतो. रस्त्यावर होणारे अपघात हे 90 टक्के मानवी चुकांमुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये वाहतूक नियमांचे पालन न करणे, निष्काळजीपणे वाहन चालविणे, वेगावर नियंत्रण नसणे, मोबाईल फोनचा अति वापर व मद्य प्राशन करून वाहन चालविणे ही प्रमुख कारणे आहेत. देशामध्ये व्यावसायिक वाहनांमध्ये भारमर्यादेचे पालन होत नसल्यानेही अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहे. देशामध्ये 2020 मध्ये 1 लाख 51 हजार 113 अपघात झाले असून, त्यामध्ये 1 लाख 31 हजार 714 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर 53 हजार 872 अपघात तर मृत्यूची संख्या 47 हजार 984 एवढी आहे.
 

अपघात  
 
अपघातामध्ये राष्ट्रीय महामार्गाचा वाटा 35.7 टक्के असून, मृत्यूची टक्केवारी 36.4 आहे. राज्य महामार्गावर 38 हजार 472 अपघात झाले असून, त्यामध्ये 33 हजार 148 लोकांचा मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये राज्य महामार्गाचा वाटा हा 25.5 टक्के असून, मृत्यूची टक्केवारी 25.2 एवढी आहे. याचाच अर्थ भारतामध्ये दरवर्षी रस्ते अपघातामध्ये लाखो लोकांचा बळी जात असून, जखमी व कायमचे अपंगत्व येणाऱ्यांची संख्या तर त्यापेक्षाही अधिक आहे.
अपघात का होतात हे प्रत्येक वाहनचालकांना माहीत असते. तरीही रस्त्यावर अपघात घडतातच. आजकाल देशामध्ये हायस्पीड वाहनांची संख्या अतिशय वाढली आहे. त्यामुळे वेगावर कोणतेही नियंत्रण राहले नाही. प्रत्येकाला इच्छित स्थळी पोहोचण्याची घाई असते. आयुष्यामध्ये ही स्पर्धा कधीतरी जीवावर बेतते. अपघात होण्यासाठी काही सेकंदाचाच अवधी पुरेसा ठरतो आणि अघटित घटना घडते. अपघात हे कुटुंब, समाज आणि राष्ट्राची हानी करणारे असतात. तरीही देशामध्ये लोकांचा अपघाताकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही. अपघात घडल्यावर काही तासांच्या चर्चेनंतर सर्व काही सुरळीत होऊन जाते. घडलेल्या घटनांचे विश्लेषण करून त्यापासून काहीतरी शिकावं हे आम्हा भारतीयांच्या रक्तातच नाही. त्यामुळे अपघाताच्या मालिका सतत सुरू राहतात. अपघातामध्ये घरामधील एखादा कर्ता पुरुष दगावला तर संपुर्ण कुटुंब उघड्यावर येतं. त्या कुटुंबाची पार वाताहत होते. खेळण्या-बागडण्याचे दिवस असणाऱ्या किंवा शिक्षण घेणाऱ्या दहावी, बारावीच्या मुलांवर घर सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडते. ज्या कुटुंबाचा काहीएक दोष नसतो त्या कुटुंबास आयुष्यभर नरक यातना भोगून जीवन जगावे लागते. प्रत्येक चालकाने ही जाणीव ठेवल्यास अपघाताचे प्रमाण निश्चित कमी होऊ शकते. रस्ते अपघातामध्ये दुचाकीच्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढीस लागले आहे. रस्त्यावर बेधुंद गतीने धावणाऱ्या दुचाकी अपघातास सर्वाधिक कारणीभूत ठरत आहेत. कोवळ्या वयामध्ये हाती आलेली दुचाकी रस्त्यावर स्टंट करीत धावताना आजकाल सहज दिसून येते. कोवळ्या वयामध्ये वेगवान गतीची हौस असली तरी एखाद्या बिकट समयी मेंदूची कार्यक्षमता पूर्णपणे विकसित झालेली नसल्याने लहान मुलांची निर्णयक्षमता त्यावेळेस दगा देते आणि अपघातास आमंत्रण देणारी ठरते.accident किती पालक या बाबीचा अभ्यास करून आपल्या मुलांच्या हातामध्ये दुचाकी देत असतील ही शंकाच आहे. रस्ते अपघामाध्ये खराब रस्त्याचाही काही वाटा असला तरी सर्वाधिक मानवी चुकाच अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. मद्य प्राशन केल्यानंतर मनुष्याचा मेंदूवरील ताबा पूर्णपणे सुटतो. त्यामुळे अशी अनियंत्रित झालेली व्यक्ती जर वाहन चालवीत असेल तर रस्त्यावर पुढे काय घडणार हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यवेत्त्याची गरज नाही. आपला जवळच्या व्यक्तीचा अचानक झालेला मृत्यू अतिशय धक्कादायक व दु:खद असतो. जाणारा आपल्या मागे बरेच काही सोडून जातो. नंतर ते सावरायला अख्खं आयुष्यही कमी पडतं. अपघातामध्ये दगावणारी व्यक्ती ही आपल्या कुटुंबासाठी आणि राष्ट्रासाठी कायम अमूल्य असते. ही जाणीव ठेवून नियमांचे पालन करून वाहन चालविल्यास अपघातरूपी लागलेला कलंक सहज पुसला जाऊ शकतो.
9881717856