महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत हेराफेरी

-काँग्रेसचा गंभीर आरोप -प्रभागांच्या याद्या चुकल्या

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
अमरावती, 
municipal-corporation-upcoming-elections : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सखोल अभ्यास व निरीक्षण करण्यात आले असता, त्यात अत्यंत गंभीर व मोठ्या प्रमाणावर त्रुटी व जाणीवपूर्वक हेराफेरी आढळून आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबतची माहिती मंगळवारी श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्र परिषदेत देण्यात आली.
 
 
 
AMT
 
 
 
संपूर्ण २२ प्रभागांच्या प्रारूप यादीत ज्या भागात काँग्रेस पक्षाची मोठी मतदारसंख्या आहे, अशा ठिकाणी प्रभागनिहाय २,५०० ते ३,५०० मतदारांची नावे कृत्रिमरीत्या दुसर्‍या प्रभागात हलविल्याचे काँग्रेस पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे. उदाहरणा दाखल सांगण्यात आले की, प्रभाग क्र. १ मधील हजारो मते प्रभाग क्र. ७ मध्ये टाकण्यात आली. प्रभाग क्र. ८ मधील सुमारे ३,५०० मते प्रभाग क्र. ११ व प्रभाग क्र. ७ मध्ये हलविण्यात आली. प्रभाग क्र. २० ची मते प्रभाग क्र. १८ मध्ये टाकण्यात आली आहेत. अशा प्रकारे शहरातील जवळपास सर्वच २२ प्रभागांमध्ये काँग्रेसची बलस्थाने असलेल्या भागातील मतदारांची नावे दुसर्‍या प्रभागात हस्तांतरित करून मतदारयादीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी करण्यात आली आहे. ही सरळ सरळ मतांची चोरी आहे आणि शहरातील जनतेची स्पष्ट दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.
 
 
गेल्या ९ वर्षांपासून अमरावती महापालिकेवर भारतीय जनता पार्टी व त्यांचे सहकारी म्हणजेच महायुतीची सत्ता आहे. या कालावधीत शहराच्या विकासासाठी एकही ठोस पाऊल उचलले गेले नाही, या उलट शहराची अवस्था अत्यंत भकास करून ठेवलेली आहे. आता जनतेमध्ये प्रचंड रोष असल्याचे व आपली सत्ता जाणार हे लक्षात आल्याने सत्ताधारी पक्षाने निवडणूक प्रक्रियेतच हस्तक्षेप करून मतदारयादीत मोठ्या प्रमाणात फेरफार केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
 
 
संपूर्ण २२ प्रभागांच्या मतदारयाद्यांचे तात्काळ पुनरावलोकन व स्वतंत्र तपासणी करावी, हलविलेली मते मूळ प्रभागात परत समाविष्ट करावी, प्रभागाच्या हद्दीबाहेरील अनोळखी मतदारांची नावे काढून टाकावी, पात्र असूनही ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत, अशा सर्व रहिवाशांची नावे संबंधित प्रभागात समाविष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. जर निवडणूक आयोग व महापालिका प्रशासनाने वरील मागण्यांबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही केली नाही, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अमरावती शहरात जनआंदोलन उभारण्यात येईल व याप्रकरणी कायदेशीर लढाई दिला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलींद चिमोटे, विलास इंगोले, अशोक डोंगरे, अ‍ॅड. दिलीप एडतकर, किशोर बोरकर, समीर जवंजाळ व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.