बुद्धिमत्तेच्या ब्रह्मास्त्राचे बूमरँग!

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
अग्रलेख  
 
boomerang माध्यमांचा आभासी मंच म्हणून जगभर वेगाने फैलावलेल्या समाजमाध्यमांनी अवघे माध्यमविश्वच आपल्या कवेत घेतल्याने, माध्यमांच्या नीतिनियमांचे रूढ संकेत आजकाल फारसे गांभीर्याने पाळले जात नाहीत असे अनेकवार उघड झाले आहे. जवळपास प्रत्येकाच्याच हाती असलेल्या मोबाईल नावाच्या तळहाताएवढ्या साधनाचा वापर करून माध्यमविश्वात सहज संचार करण्याची शक्ती प्रत्येकासच प्राप्त झाल्यामुळे या संकेतांचा संकोच होत गेला ही वस्तुस्थिती आता भविष्यभयाच्या रूपाने अधिक गडदही होऊ लागली आहे. माध्यमांवर समाजमाध्यमांचा पूर्ण पगडा प्रस्थापित झालाच, तर खरे काय व खोटे काय हे ठरविणेदेखील कालांतराने अशक्य होऊन खोट्या बाबीच खऱ्या म्हणून समाजाच्या माथी मारल्या गेल्यास त्यातून समाजात वैचारिक गोंधळ निर्माण होऊन ही स्थिती थेट अराजकापर्यंतही जाऊ शकेल अशी भीती आता डोके वर काढू लागली आहे. आजकाल ज्या वेगाने दळवणवळण व आभासी माध्यमविश्वाच्या विकासाची क्रांती सुरू झाली आहे, ते पाहता हा भविष्यकाळ आजच्या पिढ्यांपासून फार दूर नाही हे मान्य करावे लागेल.
 
 

boonrang 
 
 
तसे पाहता, क्रांती ही एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही. उत्क्रांती ही तर त्याहूनही अधिक संथपणे काळाच्या प्रवाहासोबत पुढे सरकणारी प्रक्रिया असते. या उत्क्रांतीच्या प्राथमिक टप्प्यांचा काळदेखील लाखो, हजारो वर्षांचा होता. पण आता तर, दिवसागणिक विकासाचे नवे टप्पे गाठण्याएवढा वेग वाढल्यामुळे, उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यांचे भविष्यदेखील अगदी हाकेच्या अंतरावर आल्यासारखे भासू लागले आहे. येत्या काही वर्षांत येऊ घातलेल्या नव्या क्रांतीची चर्चा सुरू झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजे, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स हा मानवाच्या जीवनातील भविष्यातील बदलाचा क्रांतिकारी टप्पा ठरणार असल्याने, साहजिकच त्याच्या गुणदोषांची चर्चा आता गांभीर्याने सुरू झाली आहे. ही नवी क्रांती माणसाचे जीवन अधिक सुसह्य करणार की सामान्य जगण्यासमोर संकटांचे डोंगर उभे करणार याची चिंताही व्यक्त होऊ लागली आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वीच्या जुलै महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेचे धोके या विषयावर झालेल्या परिषदेत ही चिंता उमटली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे माणसाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल होणार असल्याने मानवी व्यवहारांत त्याचे मूलभूत परिणाम होत राहतील, असे मत या परिषदेत ब्रिटनने नोंदविले होते, तर कृत्रिम बुद्धिमत्ता हा उधळलेला बेफाम वारू ठरू नये, अशी अपेक्षा चीनने व्यक्त केली होती. एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अविवेकी वापराच्या भीतीमुळे संभवणाèया परिणामांची चिंता व्यक्त होत असताना, भारताने मात्र, या नव्या क्रांतीच्या विवेकी वापराचा आराखडा निर्माण करण्यास सुरुवातही केली होती. मानवी मेंदूला पर्याय ठरणारी ही नवी क्रांती केवळ संकटच ठरेल असे नाही, पण त्याचा गैरवापर रोखण्यासाठी जागतिक स्तरावर तंत्रज्ञानाच्या नियमनाची सूत्रे निश्चित केली नाहीत तर मात्र ते संकट ठरू शकेल, यावर या परिषदेत एकमत झाले होते, तेव्हा भारताच्या विविध क्षेत्रांतील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे नीतिनियम निश्चित करण्याच्या प्रक्रियेसही सुरुवात झाली होती. तीन वर्षांपूर्वी, 2022 मध्ये भारताच्या यजमानपदाखाली पार पडलेल्या, जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या राष्ट्रांच्या जी-20 या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागतिक चिंता आणि त्यासंदर्भातील भारताचे महत्त्व व भूमिका जागतिक स्तरावर अधोरेखित झाली. त्या वर्षीच्या जी-20 परिषदेपाठोपाठ कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राशी संबंधित असलेल्या जागतिक भागीदारी संघटनेचे अध्यक्षपदही भारताकडे आले होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जबाबदार आणि मानवकेंद्रित विकास साधण्यासाठी कार्यरत असलेल्या ग्लोबल पार्टनरशिप ऑफ आर्टिफिशियल इन्टेलिजन्स (जीपीएआय) या आंतरराष्ट्रीय उपक्रमातही या क्षेत्रातील भारताच्या भरीव कामगिरीला मान्यता मिळाली होती. सामान्यजनांचे जीवनमान सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा नैतिक वापर करण्यावर भर देणाèया भारताच्या प्रयत्नांना मिळालेली ही जागतिक मान्यतेची पावती ठरली होती.
आज तीन वर्षांनंतर पुन्हा, जोहान्सबर्ग येथे भरलेल्या जी-20 परिषदेच्या त्याच मंचावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागतिक वापरासंबंधीच्या नैतिकतेचा पुनरुच्चार करून व्यापक समाजहिताच्या भारताच्या बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबतच त्यावर काही मोजक्यांकडून प्रस्थापित होणारी मक्तेदारी हा चिंतेचा मुद्दा असून त्यामुळे जागतिक स्तरावर वाढलेले संघर्ष ही चिंतेची बाब असल्याच्या मताचा पुनरुच्चार करून, वित्तकेंद्रित वाटचालीचा मार्ग सोडून मानवकेंद्रित वाटचालीच्या मार्गावर वाटचाल करण्याचा आग्रह मोदी यांनी पुन्हा एकदा या परिषदेत केला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जागतिक कल्याणाकरिता करावयाचा असेल तर सामूहिक सामंजस्यातून त्याचा गैरवापर टाळावाच लागेल, ही भूमिका याच परिषदेत पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याने, भारतात समाजमाध्यमांच्या मंचास भेडसावणाèया कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापराचा मुद्दा गांभीर्याने हाताळण्यावर भर देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाने पुरता कब्जा मिळविला आहे. याचा वापर करून प्रामुख्याने चारित्र्यहनन व असत्य कथनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याचेही उघड होऊ लागल्याने, तंत्रज्ञान क्षेत्रातील ब्रह्मास्त्र म्हणून जन्माला आलेले कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान बूमरँग ठरण्याची भीती या क्षेत्राला सर्वाधिक भेडसावू लागली आहे. डीप फेक आणि दहशतवादाकरिता कृत्रिम बुद्धिमत्तेचा होणारा वापर पाहता, या तंत्रज्ञानाच्या जन्मानंतर लगेचच सुरू झालेली भीती खरी ठरत असल्याची खात्रीदेखील पटू लागली आहे. त्यामुळेच या ब्रह्मास्त्राच्या गैरवापरास लगाम घालण्याकरिता जागतिक स्तरावर सहमती आणि सामूहिक प्रयत्नांकरिता पुढाकार घेण्यासाठी भारत सज्ज होत असल्याचे संकेत पंतप्रधानांनी या मंचावरून दिल्याने, पुन्हा एकदा भारताचे महत्त्व अधोरेखित होणार आहे. कोणत्याही विकसित तंत्रज्ञानाचा वापर हा संकुचित प्रादेशिक हितापेक्षा जागतिक हिताचा व्हावा ही भारताची विकासनीती यशस्वी होत असल्याचे अनेक दाखले आता समोर येऊ लागले आहेत. अंतरिक्ष संशोधन क्षेत्रात गेल्या काही वर्षांत भारताने केलेल्या प्रगतीच्या वाटचालीत जगातील अनेक देशांना सहभागी करून घेण्याची भारताची भूमिका हा त्याचा प्रत्यक्ष पुरावादेखील ठरला आहे यात शंका नाही. तीन वर्षांपूर्वीच्या दिल्ली येथील जी-20 शिखर परिषदेत भारताने मांडलेल्या भूमिकेस बळ देणारे नवे पाऊल टाकण्याची पुढची संधी या परिषदेच्या निमित्ताने भारतास मिळाल्याने, देशांतर्गत राजकारणाच्या व आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळातही अधोरेखित झालेले हे यश दुर्लक्षित राहणार नाही याची काळजी घ्यावयास हवी.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैतिक वापराच्या भारताच्या आग्रही भूमिकेचा जागतिक पुनरुच्चार अधिक प्रबळ करण्यासाठी येत्या वर्षांत फेब्रुवारी 2026 मध्ये भारताच्या यजमानपदाखाली भरविल्या जाणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता परिणाम परिषदेचे सूत्र ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ हे असणार आहे. तीन वर्षांपूर्वीच्या जी-20 परिषदेच्या यजमानपदावरून भारताने ‘वसुधैव कुटुम्बकम’ हा भारतीय संस्कृतीच्या शिकवणीचा संदेश जगाला दिला होता आणि मानवकेंद्रित जागतिक विकासाची भारताची भूमिका जगाच्या गळी उतरविण्याच्या प्रक्रियेचे पाऊल टाकले होते. जागतिक स्तरावर मानसिकतेत बदल करून जगाला व्यक्तिकेंद्रित विकासनीतीची दिशा देण्याच्या भारताच्या या पुढाकारामुळे सहकार्य, शांतता, ऐक्य व मानवतेचा नवा संदेश देण्याकरिता जी-20 परिषदेचा मंच उपयुक्त ठरणार आहे. मानसिकतेतील बदलाची ही प्रक्रिया सोपी नाही. ते एक आव्हान आहे. सध्याच्या चौकटीत ते आव्हान पेलण्याची क्षमता नाही. त्यामुळेच, काही अपेक्षांचे ओझे संयुक्त राष्ट्रांच्या खांद्यावर देऊन पंतप्रधान मोदी यांनी नव्या बदलाच्या मानसिकतेची रुजवात केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतच सुधारणा होणे आवश्यक असल्याची ठाम भूमिका या परिषदेत मांडून पंतप्रधानांनी सुधारणांसाठी आवश्यक असलेल्या जागतिक मतैक्याच्या प्रक्रियेचीही पायाभरणी केली आहे. जी-20 परिषदेत अमेरिकेच्या उपस्थितीमुळे काही राजनैतिक वादाची चिन्हे उद्भवत असताना, भारताच्या ठाम भूमिकेला मिळणारा पाठिंबा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावणारा ठरेल, अशी अपेक्षा करावयास हरकत नाही. तसे झाले, तर नवतंत्रज्ञानाची ब्रह्मास्त्रे हाताळण्याचा मंत्रदेखील भारताला गवसलेला असेल.
माध्यमांचा आभासी मंच म्हणून जगभर वेगाने फैलावलेल्या समाजमाध्यमांनी अवघे माध्यमविश्वच आपल्या कवेत घेतल्याने माध्यमांच्या नीतिनियमांचे रूढ संकेत आजकाल फारसे गांभीर्याने पाळले जात नाहीत असे अनेकवार उघड झाले आहे. जवळपास प्रत्येकाच्याच हाती असलेल्या मोबाईल नावाच्या तळहाताएवढ्या साधनाचा वापर करून माध्यमविश्वात सहज संचार करण्याची शक्ती प्रत्येकासच प्राप्त झाल्यामुळे या संकेतांचा संकोच होत गेला ही वस्तुस्थिती आता भविष्यभयाच्या रूपाने अधिक गडदही होऊ लागली आहे. माध्यमांवर समाजमाध्यमांचा पूर्ण पगडा प्रस्थापित झालाच तर खरे काय व खोटे काय हे ठरविणेदेखील कालांतराने अशक्य होऊन खोट्या बाबीच खऱ्या म्हणून समाजाच्या माथी मारल्या गेल्यास त्यातून समाजात वैचारिक गोंधळ निर्माण होऊन ही स्थिती थेट अराजकापर्यंतही जाऊ शकेल अशी भीती आता डोके वर काढू लागली आहे. आजकाल ज्या वेगाने दळवणवळण व आभासी माध्यमविश्वाच्या विकासाची क्रांती सुरू झाली आहे ते पाहता हा भविष्यकाळ आजच्या पिढ्यांपासून फार दूर नाही हे मान्य करावे लागेल.