नवी दिल्ली,
Burhan Wani's revenge दिल्लीतील कार बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाल किल्ल्याजवळ घडवून आणलेल्या स्फोटामागील सूत्रधार आणि डॉक्टरमधून आत्मघातकी दहशतवादी बनलेला उमर उन नबी हा बुरहान वाणीच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशाने या कटात सहभागी झाल्याचा तपासात उलगडा झाला आहे. फरीदाबादमध्ये अटक केलेल्या दहशतवादी मॉड्यूलमधील इतर डॉक्टरांच्या सखोल चौकशीत ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
उमर उन नबी स्वतःला ‘अमीर’ म्हणवून घेत असे आणि तो या मॉड्यूलचा नेता असल्याचा आभास निर्माण करत असे. अल फलाह विद्यापीठातील डॉ. मुझम्मिल शकील त्याला ‘अमीर’ या नावानेच संबोधत असे. शकीलला प्रथम जैश-ए-मोहम्मदच्या धर्मगुरू इरफान अहमदने या मॉड्यूलमध्ये भरती केले होते. तपासात हे देखील समोर आले आहे की या दहशतवादी गटाने त्यांच्या कटाला “ऑपरेशन अमीर” असे नाव दिले होते. उमरच्या बुद्धिमत्तेचे वर्णन करताना शकीलने चौकशीत सांगितले की उमर उन नबी हा नऊ भाषा जाणणारा अत्यंत सुशिक्षित आणि तेजस्वी व्यक्ती होता. तो इतका सक्षम होता की सहज अणुशास्त्रज्ञ बनू शकला असता, असेही त्याने तपासकर्त्यांना सांगितले.
शकीलच्या म्हणण्यानुसार, उमरचे बोलणे नेहमी तथ्य आणि संशोधनांवर आधारित असे. त्याचे व्यक्तिमत्त्व इतके प्रभावी होते की गटातील कोणालाही त्याच्या निर्णयाला विरोध करता येत नव्हता. तो नेहमी स्वतःला ‘अमीर’ म्हणून संबोधत असे आणि ‘धर्मासाठी लढणे’ हाच त्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगत असे. उमर अनेकदा मॉड्यूलमधील इतर डॉक्टरांना भारतातील परिस्थिती मुस्लिमांसाठी प्रतिकूल असल्याचे सांगत असे आणि भविष्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होऊ शकतो, म्हणून ते तयार राहावे, असे धमकीवजा संदेश देत असे. शाहीन सईद या अटक केलेल्या आणखी एका संशयितानेही या कटाच्या खोलवर रुजलेल्या विचारसरणीबाबत माहिती दिली आहे. त्यातून स्पष्ट होत आहे की उमर उन नबी हा गटाचा मुख्य मेंदू होता आणि त्याच्या प्रभावाखालीच संपूर्ण नेटवर्क काम करत होते. या नव्या उघडकीमुळे दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली असून, तपास यंत्रणा आता या मॉड्यूलच्या देशव्यापी नेटवर्कचा शोध घेत आहे.