अमरावती,
amravati-news : २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून संचमान्यता ही यु-डायस प्लस प्रणालीमधील मुख्याध्यापकांनी नमूद केलेल्या माहितीच्या आधारे केली जाणार आहे. यु-डायस प्लस प्रणालीवर मुख्याध्यापकांच्या लॉगिनमधून विद्यार्थ्यांविषयी माहिती भरण्यात आलेली आहे. सदर विद्यार्थ्यांची माहिती संच मान्यतेकरिता विचारात घेतली जाते. या माहितीचे प्रमाणीकरण व सत्यता पडताळणीची जबाबदारी ही केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांची आहे. याकरिता कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत शिक्षण संचालनालयाने दिलेल्या पत्रानुसार राज्यात एकाचवेळी सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती पडताळणी होणार आहे. या कामात कुचराई झाल्यास शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केल्या जाणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांची यु डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरण्यात येते. केंद्रप्रमुखांनी काळजीपूर्वक त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये अनियमितता झाल्यास तशी जबाबदारी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (बीट) व गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकावर निश्चित करण्यात येईल. यू-डायस प्लसकडील स्टुडंट पोर्टलवर प्राप्त झालेली माहिती केंद्रप्रमुख यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांची दैनिक उपस्थिती, भेटीच्या दिवशी हजर असलेले विद्यार्थी, परीक्षा दिनांकास उपस्थित असणारे विद्यार्थी तसेच यापूर्वी शाळेला भेट दिली असल्यास त्या दिवशीची दैनिक उपस्थिती या सर्वांचा विचार करुन केंद्रप्रमुखांनी त्यांच्या लॉगिनमधून बनावट विद्यार्थी किंवा सतत गैरहजर असणारे किंवा केवळ शिक्षक, शिक्षकेतर पदे मजूर होण्यासाठी जाणीवपूर्वक वाढविलेले पट, आदीसारखे विद्यार्थी संच मान्यतेकरिता फॉरवर्ड होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.