वनमंत्री गणेश नाईक यांच्या स्पष्ट सुचना
नागपूर
forest minister ganesh naik सागवान लाकूड बाजारात चांगल्या किमतीत विकले जाते. त्यापासून बनवलेले फर्निचर मजबूत असल्याने ते अनेक वर्षे सुरक्षित राहते. अशा परिस्थितीत वनविभागाने झाडाची लागवड करून चांगला नफा मिळविण्याचे ठरविले आहे. सागवान लाकडाची मागणी सातत्याने वाढत असताना वन विभाग आपल्या स्तरावर झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करते. मात्र आता वन विभागाच्या प्रत्येक परिक्षेत्रामध्ये किमान १०० हेक्टर मध्ये सागवानाची लागवड करण्याच्या स्पष्ट सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या आहे.

वनविभागाची आढावा बैठक सोमवारी हरिसिंग सभागृह, हिल्स येथे घेण्यात आली. वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वनविभागाच्या बैठकीत यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) संजीव गौड, प्रधान मुख्य वनसंरक्षक,सामाजिक विवेक खांडेकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन व दुय्यम संवर्ग) ऋषिकेश रंजन, प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती तंत्रज्ञान व धोरण) डॉ. प्रविण चव्हाण, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (केंद्रस्थ अधिकारी) नरेश झुरमुरे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ठ वनोपज) पी.कल्याणकुमार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.व्ही.रामाराव तसेच इतर संवर्गातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विमानतळावर गौण वनोपजाची विक्री
मुख्यत: वनविकास महामंडळाच्या ताब्यात असलेल्या सागवन लाकडापासून उभे करून त्यातून विविध कामे करण्याचे ठरविण्यात आले. याशिवाय राज्यातील विमानतळावर गौण वनोपजाची विक्री करण्यासाठी जागेची मागणी करण्यात येणार आहे. वनविभागाने यंदा १कोटी ३० लक्ष बांबु वृक्ष लागवड केल्याबद्दल वन विभागाच्या अधिकार्यांचे कौतूक केले.
सर्व सुविधा युक्त विश्रांती गृह बांधणार
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात शेतकर्यांच्या शेतीलगत वनजमिनीच्या हद्दीत बांबूची करून ५०० फुटाची भिंत उभारण्याचे महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यामुळे जंगलातील प्राण्यांपासून होणारे नूकसान टाळणे शक्य होणार आहे. ताडोबाच्या प्रत्येक प्रवेश द्वारावर वनविभागाकडून सर्व सुविधा युक्त विश्रांती गृह बांधण्याचे नियोजन करण्यात आले. वनसंरक्षणाचे कार्य करीत असताना अनेकदा वन विभागाचे कर्मचारी जखमी होतात किंवा मृत्यूमुखी पडतात अशा कर्मचार्यांना उत्कृष्ट वैद्यकिय सेवा पूरविण्याचे ठरविण्यात आले. याशिवाय कर्मचार्यांना विमा कवच असावे तसेच राहण्यासाठी सुविधाजनक घरे, अत्याधुनिक वाहने पुरविण्याचे निश्चित करण्यात आले. याशिवाय वनविभागात उत्कृष्ट काम करणार्या कर्मचार्यांचा गौरव करण्याचे ठरविण्यात आले आहे.