राज्यमंत्री, अॅड.आशिष जयस्वाल यांचे आवाहन
नागपूर,
Inauguration of AID office गडचिरोलीत लोह खनिज संपत्तीचा विपुल प्रमाणात साठा उपलब्ध असल्याने आगामी काळात संपूर्ण विदर्भाचे आणि राज्याचे आर्थिक चित्र बदलणार आहे. त्यामुळे सर्व उद्योजकांनी आपली इंडस्ट्री पॉलिसी निश्चित करावी. यात काही बदल करण्याची गरज भासल्यास निश्चितच आम्ही बदल करु आणि वेळ पडल्यास उद्योग विकासाकरिता अडथळा ठरणारे सर्व ब्रेकर हटविण्याचे असल्याचे ठोस आश्वासन नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री, अॅड.आशिष जयस्वाल यांनी दिले.
द असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट’(एआयडी) च्या सीताबर्डी येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीत नवीन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, माजी महापौर प्रा. अनिल सोले, अध्यक्ष आशिष काळे, सचिव डॉ. विजयकुमार शर्मा, कोषाध्यक्ष राजेश बागडी आदी मंचावर उपस्थित होते.
विदर्भातील उद्योगांना चांगली संधी
अॅड.आशिष जयस्वाल पुढे म्हणाले, विदर्भातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठीच द असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटची स्थापना करण्यात आली आहे. विदर्भातील उद्योगांना आपल्या व्यवसायाच्या क्षमता प्रदर्शित करण्यासाठी एक चांगली संधी मिळाली आहे. विदर्भ नागपूरच्या विकासात एआयडी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.आपल्या पुढील पिढ्यांचे भविष्य घडवण्यासाठी इंडस्ट्री पॉलिसीचे पालन व प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे.
आर्थिक विकासात विदर्भाचे योगदान
२०४७ च्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेत पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांना सर्वाधिक प्राधान्य दिल्या जात आहे. व्हिजन डॉक्युमेंट योग्य पध्दतीने राबविले तर देशाच्या आणि राज्याच्या विकासात विदर्भाचे मोठे योगदान राहणार आहे. गृह व शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, विदर्भातील उद्योगांना जागरूक करणे ही द असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट सारख्या संस्थांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी टायगर कॅपिटल म्हणून अधिक लक्ष दिल्यास विदर्भाच्या आर्थिक विकासाला बळ प्राप्त होईल. कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रशांत उगमुगे, राजेश रोकडे, मंत्री, अनुप खंडेलवाल, दीपेन अग्रवाल, जुल्फेश शहा, अविनाश घुशे,प्रणव शर्मा आदींची उपस्थिती होती.