तभा वृत्तसेवा
हदगाव,
campaigning-without-election-symbol : हदगाव नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल 10 नोव्हेंबरपासून वाजल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख तर 18 नोव्हेंबर रोजी अर्जांची छानणी पार पडली. त्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. या प्रक्रियेनंतर अध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात राहिले असून प्रभागनिहाय अनेक अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे.
परंतु अद्याप अधिकृतपणे निवडणूक चिन्ह न मिळाल्याने अनेक अपक्ष उमेदवारांना चिन्हाशिवाय प्रचार मोहीम राबवावी लागत असल्याचे चित्र हदगाव शहरात दिसून येत आहे. नेमणूक विभागाने 26 नोव्हेंबरला अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याची तारीख जाहीर केल्याने त्या दिवसापर्यंत मतदारांशी संवाद साधताना त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पक्षाच्या उमेदवारांना पक्षचिन्ह, बॅनर आणि संघटनात्मक पाठबळ मिळत असतानाच अपक्ष उमेदवार मात्र चिन्हाविना ओळख निर्माण करण्याच्या धडपडीत दिसत आहेत. प्रचारासाठी केवळ काही दिवस उरलेले असताना अपक्षांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे.
दरम्यान, पक्षीय उमेदवारांचा प्रचार अधिक जोरात सुरू असून अपक्षांनी मात्र घरदारी संवाद, मतदारांशी प्रत्यक्ष भेट, साधे पोस्टर-फ्लेक्स आणि व्यक्तिगत संपर्क यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीमध्ये यंदा जुन्या राजकीय समीकरणांची पुनरावृत्ती होत असून अनेक ठिकाणी त्याच घराण्यातील किंवा पूर्वी पद भूषवलेल्या व्यक्तींचे नातेवाईक पुन्हा रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी (दोन्ही गट) एकत्र लढत असून शिवसेना शिंदे गट आणि भाजप युती असल्याचे सांगितले जात आहे. मात्र काही ठिकाणी बॅनरवरील विसंगती, उमेदवारांना न मिळालेली जागा आणि अंतर्गत नाराजी यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.