लाडकी बहीण योजना महिलांसाठी आधार

-प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचे प्रतिपादन -धामणगावात झाला महिला मेळावा

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
धामणगांव रेल्वे,
chitra-wagh : भारतीय जनता पक्षाच्या धामणगाव नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चना अडसड - रोठे यांच्या प्रचारार्थ भाजपा महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य महिला मेळावा घेण्यात आला. राज्य शासनाची लाडकी बहीण योजना महिलांसाठी आधार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
 
 

VAGH 
 
 
 
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजना राबविल्या आहे. मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार, उज्ज्वला, मातृवंदना, बेटी बचाओ‡बेटी पढाओ यांसारख्या अनेक कल्याणकारी योजनांचा उल्लेख त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबवलेल्या ‘लाडकी बहिण’ योजनेद्वारे महिलांना मोठा आधार मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
नगरपरिषद धामणगाव रेल्वे येथील नगराध्यक्षपदाच्या भाजपाच्या उमेदवार डॉ. अर्चना रोठे यांच्यासह भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. अर्चना रोठे यांनी नगरपरिषद क्षेत्रात स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, महिलांसाठी सुरक्षितता अशा अनेक मूलभूत समस्यांवर निर्भीडपणे काम करून महत्त्वाकांक्षी योजना राबवणार असल्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाला आमदार प्रताप अडसड व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद तलवारे यांची विशेष उपस्थिती होती. मेळाव्यात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.