बार्शी,
Land for Pooja Gaikwad बार्शी सत्र न्यायालयाने सोमवारी राज्यभर गाजलेल्या उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर केला. ९ सप्टेंबरला बीडच्या लुखामसला तालुक्यातील सासुरे येथे गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या कारमध्ये रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्या घटनेनंतर पूजा गायकवाड अटकेत होती आणि पहिल्या दिवसापासून जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती.
नर्तिका पूजा गायकवाडने बार्शी सत्र न्यायालयात अॅड. धनंजय माने यांच्या माध्यमातून जामीन अर्ज दाखल केला होता. सुनावणीवेळी वकिलांनी युक्तिवाद केला की, पूजा गायकवाड हिला केवळ संशयावरून गुंतवल्याचे स्पष्ट आहे आणि मृत व्यक्तीने आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट लिहिली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करून पूजा गायकवाडला जामीन मंजूर केला. गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची ओळख दीड वर्षांपूर्वी पारगाव येथील कला केंद्रातून झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. गोविंद बर्गे नियमितपणे पूजाला भेटायला जात होते, आणि पूजाने त्यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने घेतले होते. तसेच गोविंद यांनी पूजाच्या नातेवाईकांच्या नावावर काही जमीन केली होती.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पूजाने गोविंद यांच्याकडे काही मागण्या ठेवल्या होत्या, ज्या मान्य न झाल्यास ती बलात्काराचा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी दिल्याचे समजते. या सगळ्यामुळे गोविंद बर्गे नैराश्यात गेले होते. सोमवारी मध्यरात्री गोविंद बर्गे पूजाच्या सासुरे येथील घराजवळ आले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या कारमध्ये मृतदेह आढळला, कारचे दरवाजे लॉक होते. प्राथमिक तपासणीत डोक्याच्या उजव्या भागातून गोळी शिरून डाव्या बाजूने बाहेर पडल्याचे पोलिसांनी सांगितले.