थंडीमुळे ग्रामीण भागात भरली हुडहुडी

शेकोट्यांचा आधार, तूर, कापूस, गहू व चना पिकाला लाभदायक

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव,
ralegao-cold : जिल्ह्यासह तालुक्यात थंडीच्या लाटेमुळे तापमानाचा पारा घसरला आहे. वातावरणात अचानक बदल झाल्याने सर्वत्र थंडीची हुडहुडी वाढली असून ग्रामीण भागात ऊब मिळविण्यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक, विद्यार्थी गरम कपडे वापरण्यासह शेकोट्याचा आधार घेत आहेत.
 
 
 
 
ralegao-cold
 
 
 
ग्रामीण भागात शेती कामावरही परिणाम झाला आहे. दिवाळीपासून जाणवणाèया गुलाबी थंडीने ग्रामीण भाग गारठून गेला आहे. बोचरी थंडी कडाक्यात रूपांतरित झाली असून, तापमानाचा निचांक अधिकच घसरत चालला आहे.
 
 
वाढती थंडी रबी हंगामासाठी पोषक ठरणारी असली तरी ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव निर्माण झालाय. यावर्षी नदी नाल्यांना पाणी असल्याने व तलाव धरणे भरली असल्याने गहू चन्याचा व इतर रब्बी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे.
 
 
या पिकांना सर्वत्र सिंचनाद्वारे पाणी देणे सुरु आहे. वाढीव पिक यावे म्हणून कापूस आणि तुरीलासुद्धा पाणी दिल्या जात आहे. या वाढत्या ओलितामुळे सुद्धा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात थंडावा निर्माण झाल्याने थंडीमध्ये आणखीनच भर पडली आहे. याशिवाय सायंकाळनंतर पहाटे 7 वाजेपर्यंत कडाक्याच्या थंडीसोबतच धुक्याचेही प्रमाण वाढले असून जमिनीचा वरचा थर भिजत आहे. त्यामुळेही थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ग्रामीण भागात कडाक्याच्या थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पेटल्या आहेत पहाटेच्या वेळी आणि रात्री शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव केला जात आहे.
 
 
शहरातील उबदार कपड्यांच्या दुकानावर गर्दी दिसून येत आहे मॉर्निंग वॉक केल्याने शरीर यष्टी सुदृढ, राहते म्हणूनच अनेक नागरिक पहाटे फिरायला निघतात मात्र, थंडीचे प्रमाण वाढल्याने मार्निंग वॉकच्या वेळेत अनेकांनी बदल केला. आणखी किती दिवस थंडीची लाट कायम राहणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
 
 
दिवसभराच्या गारठ्यामुळे व्यापारी वर्गाच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. सायंकाळी सहानंतर थंडीच्या प्रमाणात वाढ होत असून त्यामुळे बाजारपेठेतील व्यावसायिक दुकाने लवकर बंद करून घरी जातात लोक सायंकाळी बाहेर पडणे टाळत आहे नागरिकांना थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत असून दिवसाही कमालीची थंडी जाणवत आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला आणि ताप या बिमारीने रुग्णांच्या संख्येत मोठी गर्दी दवाखान्यात दिसूत आहे.