शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत ड्रग्सप्रकरणी गोत्यात!

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Siddhant involved in drug case बॉलिवूडमध्ये गाजत असलेल्या मोठ्या ड्रग्ज सिंडिकेट प्रकरणात आता अभिनेता शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर अडचणीत सापडला आहे. या प्रकरणात अनेक कलाकारांची नावं पुढे येत असताना, मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने सिद्धांत कपूरला चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर आज तो घाटकोपरच्या एएनसी कार्यालयात हजर झाला. तपासाच्या पुढील टप्प्यात पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. घाटकोपर एएनसी युनिटने सिद्धांतला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगताच, तो सकाळी कार्यालयात पोहोचला. याच प्रकरणात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीलाही बुधवारी हजर राहण्याचं नोटीस देण्यात आलं आहे. दरम्यान दुबईहून प्रत्यार्पित करण्यात आलेल्या प्रमुख पुरवठादार मोहम्मद सलीम सोहेल शेख उर्फ लॅविशच्या चौकशीत अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आल्यानंतर पोलिसांनी कलाकारांवरील समन्सची मालिका सुरू केली आहे. त्यापैकी सिद्धांत कपूर हा जबाब नोंदवण्यासाठी पोहोचलेला पहिला अभिनेता ठरला.


frry
 
 
पीटीआयच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका उत्पादन युनिटमधून तब्बल २५२ कोटी रुपये किमतीचा मेफेड्रोन जप्त करण्यात आल्यानंतर तपास वेगात सुरू झाला. चौकशीदरम्यान मुख्य आरोपी लॅविशने भारतात आणि विदेशात आयोजित केल्या जाणाऱ्या भव्य ड्रग्ज पार्ट्यांमध्ये सेलिब्रिटी, मॉडेल, रॅपर, निर्माते आणि अगदी दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तीही सहभागी होत असल्याचा दावा केला. या पार्ट्यांशी संबंधित दस्तऐवज तपासताना सिद्धांत कपूरचे नाव उपस्थितांच्या यादीत आढळल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तथापि, पोलिसांनी यावर स्पष्ट केले आहे की नाव समोर येणे किंवा चौकशीसाठी बोलावणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषीच आहे असे नाही. तपासाचा भाग म्हणून सिद्धांतला केवळ माहिती व जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले आहे. पुढील तपासात आणखी काही कलाकारांना समन्स पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.