वाघ बघण्याचा मोह आवरा; जीवाला सावरा!

*गिरड जंगल परिसरात हौशी पर्यटकांचा धुमाकूळ

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
विलास नवघरे
समुद्रपूर, 
Girad Jungle Area : गिरड परिसरातील खुर्सापार जंगलात तब्बल पाच वाघांचे वास्तव्य आहे. दररोज या वाघांचे दर्शन होत असल्याने हौशी पर्यटकांनी वाघांना कॅमेर्‍यात टिपण्यासाठी या परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. काही पर्यटक रात्री सुद्धा वाघांचे चित्रीकरण आणि फोटो काढण्यासाठी परिसरात जात आहेत. अद्याप या वाघांनी कोणत्याही मानवावर हल्ले केले नसले तरी वाघांना बघण्याचा मोह जिवावर बेतू शकतो. त्यामुळे वाघ बघण्याचा मोह आवरून जीवाला सावरण्याचा सल्ला वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांनी दिला आहे.
 
 
 
KL;
 
 
 
गिरड-खुर्सापार परिसरात पाच वाघांचा वावर आहे. शेतशिवारात येऊन जनावरांना भक्ष्य करीत असल्याने त्यातील एका वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. मात्र, अनेक दिवसांपासून हा वाघ वनविभागाला गुंगारा देत आहे. अशातच वाघ दिसल्याचे कळताच अनेक हौशी तरुण आणि पर्यटक जंगलातील रस्त्यावर गर्दी करून सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी अगदी वाघाच्या जवळ जाऊन मोबाईलवर फोटो आणि चित्रीकरण करीत आहेत. जवळून फोटो टिपण्यासाठी काहीजण रात्री थेट जंगलाच्या आत शिरत असल्याचे दृश्य दिसत आहे. त्यामुळे वनविभागाची चिंता वाढली असून वाघ केव्हा मनुष्यांवर हल्ला चढवेल याचा नेम नाही.
 
 
वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी रात्री सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडिओ हे जंगलातील रस्त्यावर उभे राहून अगदी रस्त्याला लागून असलेल्या ४ मिटर अंतरावरील झाडावर असलेल्या वाघाच्या २० फूट अंतरावरून चित्रीकरण केलेले असल्याचे दिसते. इतया कमी अंतरावर वाघ कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो. तसेच रस्त्यावर वाहनांच्या हालचालींमुळेही प्राण्यांना त्रास होऊन अपघाताची शयता वाढते.
 
 
गिरड-खुर्सापार हा ६ किमीचा मार्ग असून त्यातील २.५ किमी भाग जंगलातून जातो. सध्या या जंगल पट्ट्यात १२ तास सतत पथक तैनात ठेवण्यात आले आहे. वाघाचे चित्रीकरण करणार्‍या किंवा अनधिकृतरित्या जंगलात प्रवेश करणार्‍या व्यतींवर विशेष लक्ष ठेवून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. परिसरातील वाढत्या हालचालींमुळे वाघांमध्ये असुरक्षितता निर्माण होत असल्याने त्यांचे नैसर्गिक वर्तनही बाधित होत आहे. त्यामुळे प्राणी संरक्षणासोबतच मानवाच्या सुरक्षिततेसाठी कठोर बंदोबस्त आवश्यक असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांवर, अनावश्यक थांबणार्‍यांवर आणि व्हिडिओ बनवणार्‍यांवर सतत निगराणी ठेवण्यात येत असून कारवाईचे संकेतही वनविभागाने दिले आहे.