मुंबई,
Stray dogs in Maharashtra महाराष्ट्रातील भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. यापुढे भटक्या कुत्र्यांना मोकळ्या जागेत खायला देणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच अशा कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरण अनिवार्य करण्यात आले असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल.
राज्य शासनाने सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना आदेश दिले आहेत की प्रत्येक नागरी भागात कुत्र्यांना पकडण्यासाठी नियमित मोहीम राबवाव्यात, त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करावे, तसेच ज्या भागात कुत्र्यांचे पुनर्वसन किंवा सोडले जाईल त्याची संपूर्ण नोंद ठेवावी. कुत्र्यांना खाण्याची जागा निश्चित करून केवळ त्या ठिकाणीच खायला देण्याची खातरजमा करावी, अन्यथा मोकळ्या ठिकाणी खायला देणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई होईल.भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्या नागरिकांसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये ‘अँटी रेबीज’ लस आणि ‘इम्युनोग्लोब्युलिन’चा पुरेसा साठा ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे, जेणेकरून तातडीच्या परिस्थितीत नागरिकांना आवश्यक उपचार मिळतील.
महाराष्ट्रातील भटक्या कुत्र्यांची समस्या अत्यंत गंभीर आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत येथे कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांची संख्या सर्वाधिक असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांत ही समस्या शहरांमध्ये विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर आणि संभाजीनगरमध्ये वाढली आहे. महाराष्ट्रात 2022 ते 2024 या काळात १३.५ लाख कुत्र्यांच्या चावण्याच्या घटना नोंदवल्या गेल्या, तर 2019 ते 2023 या चार वर्षांत राज्यात २५ लाखांहून अधिक चावण्याच्या घटना घडल्या, ज्यात १०० जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात गेल्या वर्षभरात ७ लाख लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. मुंबईत जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या आठ महिन्यांत १०,७७८ तक्रारी नोंदवल्या गेल्या. नागपूरमध्ये २०२५ च्या पहिल्या सात महिन्यांत ६,०५६ चावण्याच्या घटना घडल्या, ज्यात १,०८५ जण गंभीर जखमी झाले, आणि गेल्या चार वर्षांत ६२ टक्क्यांची वाढ झाली. पुण्यात २०२२ पासून १ लाख चावण्याच्या घटना नोंदवल्या गेल्या. सांगली महापालिका क्षेत्रात २५ हजारांहून अधिक भटक्या कुत्री आहेत.