काबुल,
Taliban's warning to Pakistan अफगाणिस्तानातील पक्तिका, खोस्त आणि कुनार प्रांतांवरील पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांमुळे अफगाण सरकारने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या हल्ल्यांना अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर थेट प्रहार ठरवत, तालिबान सरकारने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय नियमांचे उघड उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. अफगाण सरकारने स्पष्ट शब्दांत चेतावणी दिली आहे की या कारवाईचे प्रत्युत्तर योग्य वेळी दिले जाईल.
संग्रहित फोटो
इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून प्रतिक्रिया देत पाकिस्तानची कडक शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले की, “पाकिस्तानी लष्कराने अफगाण प्रदेशात केलेली ही घुसखोरी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य तत्त्वांचे उल्लंघन आहे. या शत्रुत्वपूर्ण कृती पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाच्या सातत्यपूर्ण अपयशाचे द्योतक आहेत. मुजाहिद यांनी पुढे सांगितले की अफगाणिस्तानला त्यांच्या हवाई क्षेत्राचे आणि नागरिकांचे रक्षण करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्यांमुळे कोणतेही उद्दिष्ट साध्य झालेले नाही; उलट तणाव अधिक वाढला आहे.
तालिबान सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पाकिस्तानी लष्करी कारवाईत खोस्त प्रांतात नऊ निरपराध मुलांचा मृत्यू झाला. यामध्ये पाच मुले व चार मुलींचा समावेश आहे. एका महिलेला देखील जीव गमवावा लागला असून तिचे घर उद्ध्वस्त झाले. कुनार आणि पक्तिकामध्येही झालेल्या हवाई हल्ल्यांत चार नागरिक जखमी झाले आहेत. घडलेल्या घटनेचा माजी अफगाण अध्यक्ष हमीद करझाई यांनीही तीव्र निषेध केला. त्यांनी पाकिस्तानने दीर्घकालीन आणि स्थिर संबंधांसाठी “चांगल्या शेजारीपणाच्या तत्त्वांचे पालन करावे आणि शत्रुत्वपूर्ण धोरणांची पुनरावृत्ती करू नये,” असे आवाहन केले. पाकिस्तानकडून झालेल्या या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांतील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला असून आगामी काळात परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.