वर्धा/हिंगणघाट,
wardha-news : जिल्ह्यातील नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी प्राप्त अर्जाची छाननी झाल्यावर आक्षेपांचा सोक्षमोक्ष निवडणूक निर्णय अधिकार्यांनी लावला. निवडणूक निर्णय अधिकार्यांनी खारीज केलेेले वर्धा पालिकेतील तीन, हिंगणघाट येथील तीन तर देवळी येथील एक व पुलगाव येथील दोन प्रकरण अपिलसाठी जिल्हा सत्र न्यायालयात गेले होते. याच नऊही अपिल जिल्हा सत्र न्यायालयाने खारीज केल्या. वर्धेतील अपक्ष उमेदवार महेश तेलरांधे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.

वर्धा, हिंगणघाट, आर्वी, देवळी, पुलगाव व सिंदी रेल्वे या सहा नगरपरिषदेच्या ६ नगराध्यक्ष व १६६ सदस्य पदासाठी २ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. अपक्ष आणि विविध पक्षाचे उमेदवार या निवडणुकीत आपले राजकीय भवितव्य आजमावत आहे. अंतिम मतदार यादीनुसार वर्धा नगरपरिषद क्षेत्रात ८८ हजार १३, हिंगणघाट येथे ९४ हजार ३५६, आर्वी येथे ३६ हजार ४०७, पुलगाव येथे २९ हजार ६५, देवळी येथे १६ हजार ४५८ तर सिंदी रेल्वे नगरपरिषद क्षेत्रात १२ हजार ३८८ मतदार आहेत. प्राप्त अर्जांच्या छाननी करण्यात आलेल्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकार्यांनी खारीज केलेली वर्धा येथील तीन, हिंगणघाट येथील तीन तर देवळी येथील एक व पुलगाव येथील दोन प्रकरण अपिलासाठी जिल्हा सत्र न्यायालयाची पायरी चढले. या नऊही अपिल जिल्हा सत्र न्यायालयाने २४ रोजी खारीज करीत निवडणूक निर्णय अधिकार्यांनी दिलेला आदेश न्यायालयाने कायम ठेवला आहे.
हिंगणघाट : येथील प्रभाग ५ मधील दोन उमेदवारांच्या नामांकनावर विरोधी उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे दाद मागण्यात आली. त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले. सोमवार २४ रोजी उशिरापर्यंत जिल्हा सत्र न्यायालयमध्ये सुनावणी झाली. आज मंगळवार २५ रोजी दुपारी ३ वाजता न्यायालयाने या याचिका पुराव्या अभावी खारीज केल्या. त्यामुळे दोन्ही उमेदवारांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. उमेदवार राजू कामडी व मंदा राऊत यांच्या उमेदवारी अर्जावर संजय नेहरोत्रा व रागिनी शेंडे यांनी याचीका दाखल करून आक्षेप घेतला. अतिरिक्त जिल्हा न्यायालयामध्ये आक्षेप सुनावणीस आला. सोमवार २४ रोजी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून २५ रोजी निर्णय देण्याचे जाहीर केले. त्यानुसार आज मंगळवार २५ रोजी न्यायालयाने आक्षेप घेतलेल्या दोन व अन्य एक अशा तीन याचिका पुराव्या अभावी खारीज करण्याचे आदेश पारित केले. याचिका कर्ताकडून अॅड. आनंद देशपांडे नागपूर, अॅड. इब्राहिम बक्ष विरुद्ध बाजूने अॅड. धारकर व अॅड. अक्षय वाशीमकर यांनी युक्तिवाद केला.
निवडणूक रिंगणात कुठे किती उमेदवार?
पालिका : नगराध्यक्ष : नगरसेवक
वर्धा : ०८ : १९०
हिंगणघाट : १० : २२१
आर्वी : ०६ : ८६
पुलगाव : ०८ : १२३
देवळी : ०५ : ७०
सिंदी रेल्वे : ०६ : ९८