जानेवारीत गोव्यात जागतिक मराठी संमेलन रंगणार

    दिनांक :25-Nov-2025
Total Views |
पणजी,
World Marathi Conference in Goa पणजी (गोवा) येथे ९ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत जागतिक मराठी अकादमीच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या ‘शोध मराठी मनाचा’ या भव्य जागतिक संमेलनाचे उद्घाटन दि. ९ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे स्वागताध्यक्ष म्हणून भूमिका निभावतील, तर ‘पद्मविभूषण’ डॉ. अनिल काकोडकर संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या तीन दिवसांच्या संमेलनात विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या मराठी व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती, जीवनप्रवासाचे सादरीकरण आणि गोव्याच्या स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

World Marathi Conference in Goa
 
या संमेलनात उद्योग, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाला सन्मानित करण्यात येणारे दोन मानाचे पुरस्कार जाहीर झाले असून, गोव्याचे प्रख्यात उद्योगपती अनिल खवटे यांना ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कार’, तर चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांना ‘मराठी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. हे पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान केले जातील. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संमेलनाची माहिती दिली. कार्याध्यक्ष दशरथ परब, अनिल सामंत, रमेश वंसकर आणि कार्यवाह गौरव फुटाणे हे संमेलनाच्या तयारीत गुंतले आहेत. फुटाणे यांनी सांगितले की, जगभरातील मराठी बांधवांच्या उपस्थितीत आयोजित या जागतिक संमेलनात मराठी संस्कृती, साहित्य, उद्योग आणि कलाक्षेत्रातील कर्तबगारांना एकत्र येण्याची मोठी संधी मिळणार आहे.
 
 
अनिल खवटे यांनी सिव्हिल इंजिनिअर म्हणून सुरुवात करून अल्कॉन समूहाच्या माध्यमातून बांधकाम, रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी, सिमेंट, ऑटोमोबाईल्स, लॉजिस्टिक्स आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत व्यवसायाचे साम्राज्य उभारले. हॉटेल डेल्मन, हॉटेल रोनिल (Hyatt JdV), अल्कॉन सिमेंट, Hyundai–Mercedes-Benz डीलरशिप, रेडिमिक्स काँक्रीट आदी महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे गोव्याच्या उद्योगविश्वाला नवीन दिशा मिळाली. शिक्षण आणि समाजकार्यातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना उद्योग रत्न, प्राईड ऑफ गोवा तसेच पोर्तुगाल सरकारचा “कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिट” यांसह अनेक सन्मान मिळाले आहेत.
 
 
महेश मांजरेकर यांनी रंगभूमीपासून चित्रपटसृष्टीपर्यंतच्या प्रवासात मराठी आणि हिंदी दोन्ही माध्यमांमध्ये भक्कम स्थान मिळवले आहे. अस्तित्व, वास्तव, नटसम्राट, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, सिटी ऑफ गोल्ड, काँटे, दबंग ३ अशा प्रभावी चित्रपटांत त्यांनी दिग्दर्शन, अभिनय आणि निर्मितीची उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या प्रभावी कथनशैली, सामाजिक भान आणि प्रयोगशीलतेमुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक मान्यताप्राप्त पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. मराठी विश्वातील मान्यवरांच्या उपस्थितीत, उद्योग आणि कलाक्षेत्रातील या दोन महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वांचा गौरव ‘शोध मराठी मनाचा’ संमेलनातून साजरा होणार असल्याची माहिती फुटाणे यांनी दिली.