चेन्नई,
35 Indian fishermen arrested श्रीलंकेच्या नौदलाने पुन्हा एकदा भारतीय मच्छिमारांवर कारवाई करत तामिळनाडूतील तब्बल ३५ मच्छिमारांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या बोटी जप्त केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषा ओलांडून श्रीलंकेच्या पाण्यात मासेमारी केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या मच्छिमारांपैकी चार जण तामिळनाडू आणि पुडुचेरी येथून पारंपरिक देशी बोटीतून समुद्रात गेले होते. काल त्यांना अटक करून त्यांची बोट जप्त करण्यात आली. त्यानंतर आणखी तीन मोटर बोटींवरील ३१ मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने पकडले. या तीन मोटर बोट्यांमध्ये प्रत्येकी दहा मच्छिमार आणि एका बोटीत अकरा मच्छिमार होते. सर्व बोटींसह सर्वांना ताब्यात घेऊन जाफना किनाऱ्याजवळील कंकेसंथुराई नौदल छावणीत नेण्यात आले.
चौकशीनंतर सर्व मच्छिमारांना जाफना मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येईल, अशी माहिती श्रीलंकेच्या नौदल प्रवक्त्याने दिली. त्यानंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करून कारावासात टाकण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही सांगितले गेले. जाफना मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, अटक केलेले सर्व मच्छिमार तामिळनाडूतील नागपट्टिनम आणि कराइकल परिसरातील असण्याची शक्यता आहे.
गेल्या दीड महिन्यात श्रीलंकेच्या नौदलाने अशाच प्रकारे ४० हून अधिक भारतीय मच्छिमारांना अटक केली असून, त्यामुळे तामिळनाडूच्या किनारी भागात पुन्हा भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. या सततच्या अटकांमुळे मच्छिमार कुटुंबांमध्ये संताप व्यक्त होत असून, त्यांनी भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा आणि श्रीलंकेसोबतच्या सागरी सीमावादावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. तसेच आधीच श्रीलंकेच्या तुरुंगात असलेल्या तामिळ मच्छिमारांची सुटका व्हावी, अशीही मागणी सातत्याने केली जात आहे.