सव्वा कोटींच्या अपहार प्रकरणी प्रभाग संघावर कारवाई

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
वर्धा,
embezzlement case उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष देवळी येथील महिला शती प्रभाग संघ, गुंजखेडा येथे झालेल्या आर्थिक अपहार प्रकरणात संबंधितांवर मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांनी कठोर कारवाई केली आहे. चौकशीनंतर या प्रभाग संघात १ कोटी २१ लाखाचा अपहार आढळून आला होता.
 
 

अपहार प्रकरण  
 
 
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष देवळी येथे महिला शती प्रभागसंघ गुंजखेडा अंतर्गत तत्कालीन संघटीका वहिदा शेरमोहम्मद शेख यांनी आर्थिक अपहार केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांना प्राप्त झाली होती. त्यांनी अपहाराची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली होती. चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालावरुन मुद्दल रुपये ५८ लाख ४ हजार ८७१ रुपये व व्याज ६३ लाख ६१ हजार २१० रुपये असे १ कोटी २१ लाख ६६ हजार ८१ रुपयांचा अपहार उघडकीस आला. त्यामध्ये ४० लाख १८ हजार रुपयांचा भरणा करण्यात आला. आर्थिक अपहार उघडकीस आल्याने सोमन यांनी अधिकारी, कर्मचारी, संबंधित सर्व समुदाय संसाधन व्यक्तींवर कठोर कारवाई केलेली आहे.
अपहार प्रकरणातील तत्कालीन संघटीकेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रभागसंघाचे अध्यक्ष, सचिव व तालुका व्यवस्थापक यांना सूचित करण्यात आले असून सदर प्रक्रिया पुलगाव पोलिस स्टेशन अंतर्गत कार्यवाही चालू आहे. संबंधित प्रभागाचे प्रभाग समन्वयक सचिन मगरे व प्रभागसंघ व्यवस्थापक ममता कांबळे यांना तत्काळ पदावरुन कमी करण्यात आलेले आहे. या प्रकरणात समाविष्ठ असलेल्या सारिका वासनिक, सपना पर्बत, पुजा काळे, वैशाली काळे, पद्मा मस्तूद, बेबी खडसे, सिंधू केवट या ७ महिलांना तत्काळ पदावरुन कार्यमुत करण्याचे आदेश देण्यात आले आहे.embezzlement case तालुका व्यवस्थापक गोपाल साबळे आणि तत्कालीन तालुका व्यवस्थापक वर्षा कोहळे यांचे दोन मागील करार कालावधीतील वार्षिक मानधनवाढ कायमस्वरुपी थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहे, असे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या जिल्हा अभियान सहसंचालक तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ यांनी कळविले आहे.