सिएटल,
Amazon goodbye to 14,000 employees जगातील अग्रगण्य ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जगभरातील सुमारे १४,००० कर्मचाऱ्यांना एका सकाळीच ईमेलद्वारे कामावरून कमी केल्याचे वृत्त समोर आले आहे. या अनपेक्षित निर्णयामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड धक्का बसला आहे. कंपनीने सकाळी लवकर सर्व प्रभावित कर्मचाऱ्यांना दोन संदेश पाठवले पहिल्या संदेशात “कृपया तुमचा ईमेल तपासा” असे लिहिले होते, तर दुसऱ्या संदेशात हेल्प डेस्कचा क्रमांक देण्यात आला होता. जेव्हा कर्मचाऱ्यांनी ईमेल उघडले, तेव्हा त्यांना त्यांच्या सेवांना ताबडतोब थांबविल्याची माहिती मिळाली. अनेक कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये पोहोचण्याआधीच त्यांच्या बॅज, ईमेल आणि लॉगिन अॅक्सेस बंद करण्यात आले.

या मोठ्या कपातीचा सर्वाधिक फटका कंपनीच्या रिटेल मॅनेजमेंट टीम्सना बसल्याचे सांगितले जाते. अमेझॉनकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार, हा निर्णय व्यवसायातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि नवोपक्रमाला गती देण्यासाठी घेण्यात आला आहे. परंतु अचानक आणि अमानवीय पद्धतीने दिलेल्या या नोटिसांमुळे कर्मचारी वर्गात संताप आणि नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीच्या एचआर प्रमुख बेथ गॅलेटी यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अंतर्गत पत्रात म्हटले आहे की, प्रभावित सर्व कर्मचाऱ्यांना पुढील ९० दिवसांचे वेतन, सेवानिवृत्ती पॅकेज आणि नोकरी शोधासाठी सहाय्य दिले जाईल. त्यांनी पुढे लिहिले की, हा काळ आमच्यासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठीही कठीण आहे, पण आम्ही सर्वांना शक्य तितका आधार देऊ.
गॅलेटी यांनी स्पष्ट केले की अमेझॉनची ही रणनीती केवळ खर्च कपातीशी संबंधित नसून ती कृत्रिम बुद्धिमत्ताच्या वाढत्या वापराशी जोडलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, एआयच्या तंत्रज्ञानामुळे काम करण्याच्या पद्धतींमध्ये मोठा बदल होत असून, कंपनीला आपल्या पायाभूत रचनेत सुधारणा करावी लागणार आहे. दरम्यान, गुगल, मेटा आणि टेस्ला सारख्या इतर जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांनी देखील यापूर्वी अशाच प्रकारे ईमेल किंवा संदेशाद्वारे कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी केले होते. अमेझॉनच्या या निर्णयानंतर आता पुन्हा एकदा तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा प्रश्न चर्चेत आला आहे.