तभा वृत्तसेवा यवतमाळ,
Hemant Khadke सर्जनशील क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (यंत्र) माणसाची जागा घेऊ शकत नाही. नवसर्जनामध्ये संस्कृती, परंपरा आणि कलावंताचा जीवनानुभव या गोष्टी महत्त्वाच्या असतात. एआय जीवनाचा अनुभव घेऊ शकत नाही, त्यामुळे एआयने केलेली निर्मिती ही अखेर मानवाचीच निर्मिती ठरते, असे विचार प्रा. हेमंत खडके यांनी 69व्या विदर्भ साहित्य संमेलनात झालेल्या ‘सर्जनशील क्षेत्रात युवक, बेरोजगार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.
पत्रकार मिलिंद कीर्ती, प्रा. ज्ञानेश्वर गटकर व प्रा. अन्नपूर्णा चौधरी या वक्त्यांचा सहभाग असलेला हा परिसंवाद चांगलाच रंगला होता. आपल्या भाषणात प्रा. खडके पुढे म्हणाले, दुःखाच्या दर्शनाने एआय हादरून गेल्याचे अजून तरी ऐकायला मिळत नाही. दिलेल्या माहितीवरून यंत्र एखादे चित्र काढू शकेल, पण चित्राविषयी जर एखादा गुंतागुंतीचा प्रश्न रसिकांनी विचारला तर त्याचे उत्तर यंत्राला देता येणार नाही. मानव-मानव संबंधांना मानव-यंत्र संबंध पर्याय ठरू शकत नाहीत. एआय माणसाला सहायकारी मात्र ठरू शकते. शिक्षण, वैद्यक, कायदा, पत्रकारिता या क्षेत्रांमध्ये जी संवेदनशीलता आणि मूल्यदृष्टी आवश्यक असते, ती शिकणे एआयसाठी सध्यातरी कठीण आहे. त्यामुळेही ते माणसाची जागा घेऊ शकत नाही.
पत्रकार मिलिंद कीर्ती Hemant Khadke यांनी एआयची मालकी असलेल्या बड्या कंपन्यांच्या नफेखोर वृत्तीचा संदर्भासह उलगडा केला. प्रा. ज्ञानेश्वर गटकर यांनी विषयाची मांडणी करण्यापूर्वी चॅटजीपीटीने तयार केलेले गीत ऐकवले. प्रा. अन्नपूर्णा चौधरी यांनीही या विषयावरील आपले विचार व्यक्त केले. एकंदरीतच परिसंवाद चांगला रंगला. अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दे या परिसंवादात उपस्थित करण्यात आले. सभागृहात यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते, वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, संमेलनाचे आमंत्रक तीर्थराज कापगते, आयोजक हेमंत कांबळे, पत्रकार श्रीपाद अपराजित यांच्यासह अनेक श्रोते उपस्थित होते.