भाजपाचा प्रचार पाहण्यासाठी ७ देशांचे राजनैतिक अधिकारी बिहारमध्ये

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
बिहार,
Bihar assembly election बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा उत्साह चांगलाच रंगात आला असताना आता या निवडणुकीकडे परदेशी राजनैतिक प्रतिनिधींचंही लक्ष लागलं आहे. जपान, इंडोनेशिया, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, भूतान आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचा एक प्रतिनिधीमंडळ दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) निवडणूक प्रचार मोहिमेची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
 

Bihar assembly election 
या प्रतिनिधीमंडळाने बिहारमधील आरा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेला उपस्थित राहून लोकांचा उत्साह आणि मोठ्या प्रमाणावरची जनसहभाग पाहिली. भाजपच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनी सांगितले की, या दौऱ्याचा उद्देश भारतीय निवडणुकीतील लोकशाही प्रक्रिया आणि पक्षांच्या जनसंपर्क मोहिमांचा अभ्यास करणे हा आहे.
दोन दिवसांच्या या दौऱ्यात परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, धर्मेंद्र प्रधान आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांची भेट घेतली. त्यांनी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत घराघरात चालणाऱ्या प्रचार उपक्रमांचं निरीक्षणही केलं.यानंतर प्रतिनिधीमंडळाने पाटणा येथील भाजप प्रदेश कार्यालयालाही भेट दिली. येथे त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक रचना, संवाद धोरण आणि निवडणूक व्यवस्थापन प्रणालीविषयी वरिष्ठ नेत्यांकडून माहिती घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी भारतीय निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही सहभागाची प्रशंसा केली.बिहार विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत होणार असून पहिला टप्पा ६ नोव्हेंबरला आणि दुसरा टप्पा ११ नोव्हेंबरला पार पडेल. मतमोजणी १४ नोव्हेंबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यात १२१ तर दुसऱ्या टप्प्यात १२२ मतदारसंघांमध्ये मतदान होईल.या राजनैतिक प्रतिनिधींच्या भेटीमुळे बिहार निवडणुकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरही उत्सुकतेने पाहिले जात आहे.