पर्यटकांनो लक्ष द्या...मालदीवमध्ये सिगारेट आणि व्हेपिंगवर निर्बंध

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
मालदीव,
Cigarette ban in Maldives भारतीयांसाठी लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या मालदीवमध्ये आता धूम्रपान आणि व्हेपिंगवर पूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार, तंबाखू आणि इलेक्ट्रॉनिक सिगारेट (व्हेपिंग) चा वापर, विक्री, वितरण, आयात आणि ताब्यात ठेवणे पूर्णतः प्रतिबंधित राहील. या निर्णयाचा थेट परिणाम मालदीवला भेट देणाऱ्या हजारो भारतीय आणि परदेशी पर्यटकांवर होणार आहे. मालदीव सरकारने स्पष्ट केले आहे की ही बंदी सर्व वयोगटांवर लागू असेल आणि उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. व्हेपिंग डिव्हाइस वापरताना पकडलेल्या व्यक्तीस ५,००० रुफिया (सुमारे ₹२८,४००) दंड, तर अल्पवयीनांना तंबाखू विकणाऱ्यांसाठी ५०,००० रुफिया (सुमारे ₹२.८४ लाख) दंडाची तरतूद आहे.
 
 

Cigarette ban in Maldives 
 
मालदीवमध्ये तंबाखूचे प्रमाण चिंताजनक असल्याचे सरकारने मान्य केले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १५ ते ६९ वयोगटातील लोकांपैकी चौथ्या भागाहून अधिक लोक धूम्रपान करतात, तर १३ ते १५ वयोगटातील किशोरवयीनांमध्ये हा दर दुप्पट आहे. त्यामुळे सरकारने देशभरात “धूम्रपानमुक्त पिढी” तयार करण्यासाठी हे कठोर पाऊल उचलले आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, दरवर्षी ७० लाखांहून अधिक लोक धूम्रपानामुळे मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे मालदीव सरकारने जागतिक आरोग्य मानकांचे पालन करत हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. अशा प्रकारची बंदी न्यूझीलंडने २०२३ मध्ये लागू केली होती, मात्र राजकीय कारणांमुळे काही महिन्यांनंतर ती मागे घेतली गेली. यूकेमध्येही अशाच प्रकारच्या कायद्यावर काम सुरू आहे, परंतु मालदीवने तो प्रभावीपणे लागू करून एक मोठे उदाहरण ठेवले आहे. नवीन नियमांमुळे मालदीवमध्ये जाणाऱ्या पर्यटकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे, कारण आता तेथे “नो स्मोकिंग, नो व्हेपिंग झोन” औपचारिकरित्या जाहीर झाले आहे.