नवी दिल्ली,
Cyclone alert चक्रवाती वादळ ‘मोंथा’नंतर पुन्हा एकदा देशातील अनेक भागांवर पावसाचं आणि वादळाचं संकट घोंगावत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी चेतावणी देत सांगितलं की, बंगालच्या उपसागरावर नवीन चक्रवाती परिसंचरण (Cyclonic Circulation) तयार होत आहे. या प्रणालीमुळे अंडमान-निकोबार बेटांसाठी “चक्रवाताची पूर्वसूचना” जारी करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हे वादळ ४ नोव्हेंबरपासून वेग घेण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास बंगालच्या उपसागराच्या पूर्व-मध्य भागात आणि म्यानमार किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा तयार होऊ लागला. या कमी दाबाच्या पट्ट्याशी संबंधित चक्रवाती परिसंचरण समुद्रसपाटीपासून जवळपास ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत पसरलेले असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील ४८ तासांत ही प्रणाली उत्तर व त्यानंतर उत्तर-पश्चिम दिशेने सरकत म्यानमार-बांगलादेश किनाऱ्यांच्या दिशेने पुढे जाईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.या प्रणालीमुळे अंडमान सागराच्या उत्तरी भागात ५५ किलोमीटर प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहतील, अशी चेतावणी देण्यात आली आहे. हवामान खात्याने सांगितले की, ४ नोव्हेंबरनंतर ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, समुद्राची स्थिती अत्यंत खवळलेली आणि अस्थिर राहणार आहे.
दरम्यान,Cyclone alert स्थानिक प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच बोट चालक, बेटांवरील रहिवासी आणि पर्यटक यांनी सावधगिरी बाळगावी, समुद्रकिनाऱ्याजवळील मनोरंजनात्मक उपक्रमांपासून दूर राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.हवामान विभाग सतत या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, ही प्रणाली येत्या काही दिवसांत गंभीर चक्रवाताचे रूप धारण करण्याची शक्यता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बंगालच्या उपसागरातील वाढत्या चक्रवाती हालचालीमुळे पूर्व आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.