दारव्हा नपच्या कर वाढीबद्दल नागरिकांत तीव्र असंतोष

नागरिकांची नपमध्ये धडक

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा दारव्हा,
Darwha Nagar Parishad दारव्हा नगर परिषदेतर्फे जुन्या कर आकारणीपेक्षा आता नवीन कर आकारणी करून नागरिकांना दिले आहे. त्यामध्ये जवळपास 20 टक्के करवाढ करण्यात आली आहे. या करवाढीचा आर्थिक फटका बसत असल्याने नागरिकांनी सोमवार, 3 नोव्हेंबर रोजी दुपारी नपमध्ये मुख्याधिकाèयांची भेट घेऊन चर्चा केली.
 
 

Darwha Nagar Parishad 
दारव्ह्यात नपतर्फे जी करवाढ झाली त्याबद्दल नागरिकात तीव्र असंतोष असून तो व्यक्त होण्यासाठी नागरिकांनी सोमवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान नपमध्ये धडक दिली. त्यामध्ये गावातील विविध भागातील विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत सामाजिक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. नपच्या हॉलमध्ये नपचे मुख्याधिकारी व उपस्थित दारव्हेकर नागरिक यांच्यात नवीन झालेल्या करवाढीबाबत चर्चा झाली. त्यामध्ये नागरिक चांगलेच संतापलेले व आक्रमक भूमिकेत दिसले.
नागरिकांमधून अ‍ॅड. राजेश जाधव, डॉ. मनोज राठोड, अशोक जयसिंगपुरे, सेवानिवृत्त प्राचार्य सुरेश निमकर, माजी नगरसेवक रवी तरटे, चंद्रकांत मुंगीलवार, हरीष जाधव यांनी नवीन करवाढीबद्दलच्या नागरिकांच्या तीव्र संवेदना व्यक्त केल्या. त्या सर्व नप मुख्याधिकाèयांनी ऐकून घेतल्या. नपने ही करवाढ कोणत्या नियमांनुसार व कशाप्रकारे केली ते सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या त्या सांगण्याने नागरिकांचे समाधान झाले नाही. तसेच त्यांनी सांगितलेल्या सूत्रानुसार, लावण्यात आलेले कर व मार्गदर्शक सूचनात तफावत असल्याचे जाणवले. कर आकारणी करताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यात येईल असेही मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी आश्वस्त केले.
नपकडून लादण्यात येत असलेली करवृद्धी नियमबाह्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी ज्या सुत्रांनुसार किंवा मार्गदर्शक तत्वानुसार करवाढ करण्यात आली त्या दस्तऐवजाच्या प्रती लिखीत स्वरुपात देण्यासाठी निवेदन डॉ. मनोज राठोड, अ‍ॅड. राजेश जाधव व ज्येष्ठांमार्फत मुख्याधिकारी यांना देण्यात आले.