काबुल,
earthquake in afghanistan अफगाणिस्तानच्या हिंदूकुश पर्वतरांगेत सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपाने पुन्हा एकदा जनजीवन हादरले. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ इतकी होती. या हादऱ्यांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे १५० जण जखमी झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भूकंपाचे केंद्र खुल्मच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे २२ किलोमीटर अंतरावर, २८ किलोमीटर खोलीवर असल्याचे नोंदवले गेले. अनेक भागात इमारती आणि घरांना तडे गेले, तर काही ठिकाणी भिंती कोसळल्याचे वृत्त आहे. या आधीही अफगाणिस्तानात अशा भूकंपांनी प्रचंड हानी केली होती. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पाकिस्तान सीमेच्या जवळील भागात ६.० तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्यात २,२०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. त्यापूर्वी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी ६.३ तीव्रतेच्या भूकंपानंतर आलेल्या धक्क्यांमध्ये तब्बल ४,००० लोकांचा मृत्यू झाला होता. अलीकडेच २२ ऑक्टोबर रोजी हिंदूकुश भागात ५.१ रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यात आला होता, ज्याचे केंद्र २४४ किलोमीटर खोलीवर होते. त्या वेळीही राजधानी काबूलसह अनेक शहरांमध्ये जोरदार धक्के जाणवले होते.