बिजनोर,
IIT graduate commits suicide आयआयटी कानपूरची पदवीधर आणि यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणीने गंगेत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. मीरापूर आणि शहर पोलिस ठाण्याचे पथक तसेच एसडीआरएफच्या गोताखोरांकडून तिचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चांदपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खानपूर माजरा गावातील संग्रह अमीन वेदप्रकाश हे बिजनोरमधील आदर्श नगर कॉलनीत वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी ललिता राणी आयआयटी कानपूरमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवून गेल्या काही वर्षांपासून यूपीएससी परीक्षेची तयारी करत होती. अनेक प्रयत्नांनंतरही तिला यश मिळाले नव्हते, त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या तणावाखाली होती.
सोमवारी सकाळी ललिता नेहमीप्रमाणे शेजारच्या एका किशोरीसोबत घराबाहेर पडली. दोघी रेल्वे स्टेशनकडे जाण्याचे सांगून बाहेर पडल्या, मात्र थेट रोडवेज बसने गंगा बॅरेज घाटाकडे गेल्या. तेथे पुलावरून दोघी चालत असताना अचानक ललिताने गेट क्रमांक २८ जवळ रेलिंगवर चढून गंगेत झेप घेतली. हे पाहून तिच्या सोबत असलेल्या मुलीने आरडाओरड केली, पण तोपर्यंत ललिता खोल पाण्यात अदृश्य झाली होती.
गोताखोर आणि पाटबंधारे विभागाच्या पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. बॅरेजचे गेट बंद करून शोध सुरू असला तरी अद्याप तिचा काहीच ठावठिकाणा लागलेला नाही. पाण्याची खोली व प्रवाह जास्त असल्याने शोधकार्य कठीण बनले आहे. घटनेची माहिती मिळताच मीरापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी रवींद्र सिंग आणि शहर पोलिस निरीक्षक धर्मेंद्र सिंग सोलंकी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी एसडीआरएफ टीमला मदतीसाठी पाचारण केले. ललिताच्या कुटुंबीयांना याची माहिती दिल्यानंतर तेही घटनास्थळी धावून आले. प्राथमिक तपासात असे स्पष्ट झाले आहे की, यूपीएससी परीक्षेत वारंवार अपयश आल्याने ती निराश झाली होती आणि त्याच नैराश्यातून तिने गंगेत उडी मारण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी आत्महत्येचे कारण निश्चित करण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.