तभा वृत्तसेवा घाटंजी,
Kartiki Dehankar यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहूल भागातील एका मुलीने थेट संसदेत ‘नो युवर लीडर’ या राष्ट्रीय कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आपल्या वक्तृत्वाची छाप उमटवली. कार्तिकी किरण डेहणकर असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती शिक्षण प्रसारक मंडळ कन्याशाळेची विद्यार्थिनी आहे. तीने आत्मविश्वासाने भाषण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा क्षण घाटंजी तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरले.
दिल्लीतील संसद भवनात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवड झालेल्या काही विद्यार्थ्यांना संसद कार्यप्रणालीची माहिती देण्यात आली. त्यापैकी निवडक विद्यार्थ्यांना सभागृहात भाषणाची संधी देण्यात आली. महाराष्ट्रातून कार्तिकीला ही संधी मिळाली आणि तिने ती संधी प्रभावीपणे साधली. ‘जिनके विचारों से संपूर्ण महाराष्ट्र का निर्माण हुआ’, या ओळींनी तिने भाषणाला सुरुवात केली. शिवरायांच्या भूमीवरून संसदेत बोलताना तिने अभिमान व्यक्त केला. सरदार पटेल यांच्या कार्याचा उल्लेख करत तिने अनेक संस्थानांमध्ये विभागलेला भारत एका सूत्रात बांधण्याची ताकद पटेलांनी दाखवली, असे सांगितले.
देशाची प्रगती फक्त तंत्रज्ञानाने नव्हे, तर मनं जोडल्याने होते. जाती, धर्म आणि प्रांतांच्या भिंती ओलांडून एकत्र येणे, हाच पटेलांचा खरा वारसा आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कार्तिकीच्या वक्तृत्वाचे कौतुक केले. कार्तिकीच्या या यशामागे शिक्षक अतुल ठाकरे यांचे मार्गदर्शन आणि शाळेतील सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत. शालेय विद्यार्थीदशेत देशाच्या सर्वोच्च सभागृहात व्यक्त होण्याची संधी मिळणे दुर्मिळ आहे. आम्हाला संसदेच्या सर्व कामकाजाची माहिती देण्यात आली. लोकसभाध्यक्षांनी भेटून मार्गदर्शन केले. मला येथे पोहोचविण्यास मदत करणारे सर्व शिक्षक व मार्गदर्शकांची मी आभारी आहे, अशी प्रतिक्रिया कार्तिकी डेहणकर हिने व्यक्त केली. याबद्दल कार्तिकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.