Special Yoga of Saturn दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर कर्मफलदाता शनि आपली वक्री चाल थांबवून पुन्हा थेट मार्गावर येणार आहे. येत्या २८ नोव्हेंबर २०२५ रोजी शनि सुमारे १३८ दिवसांच्या वक्री अवस्थेनंतर थेट मीन राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिचं हे संक्रमण अत्यंत महत्त्वाचं असून, सुमारे पाच वर्षांनंतर असा विशेष योग घडत आहे. या बदलाचा परिणाम केवळ ग्रहांच्या स्थितीवरच नव्हे, तर मानवी जीवनाच्या अनेक क्षेत्रांवर करिअर, व्यवसाय, अर्थकारण आणि वैयक्तिक संबंधांवर खोलवर जाणवेल.
शनीला न्यायाचा देव मानलं जातं. तो कर्मानुसार फल देतो आणि शिस्त, संयम आणि कठोर परिश्रमाचं प्रतीक आहे. त्यामुळे त्याचं थेट होणं म्हणजे कर्मांच्या परिणामांचा वेग वाढणं असं मानलं जातं. यावेळी अनेक राशींवरून साडेसाती आणि धैय्याचा प्रभाव कमी होणार असून काही राशींना मोठा दिलासा मिळेल. या शनिच्या संक्रमणाचा सर्वाधिक सकारात्मक प्रभाव कर्क, सिंह, कुंभ आणि मीन राशींवर दिसून येईल.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ आशादायी ठरेल. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि आर्थिक स्थैर्य मिळेल. नोकरीत पदोन्नती किंवा उत्पन्नवाढीची संधी निर्माण होईल.
सिंह राशीच्या जातकांसाठी शनिचं हे संक्रमण सामाजिक प्रतिष्ठा, मान-सन्मान आणि व्यावसायिक यश घेऊन येईल. करिअरमध्ये प्रगती होईल, तसेच प्रभावशाली व्यक्तींचे सहकार्य लाभेल.
कुंभ राशीच्या लोकांना गुंतवणूक, मालमत्ता खरेदी आणि पदोन्नतीचे शुभ संकेत मिळतील. व्यवसायिकांना नवा आत्मविश्वास मिळेल आणि जुने अडथळे दूर होतील.
मीन राशीच्या जातकांसाठी हा काळ परिवर्तनाचा टप्पा ठरेल. साडेसातीचा प्रभाव कमी होऊन नवीन संधी आणि शांतीचा काळ सुरू होईल. शनिच्या कृपेने मनःशांती आणि स्थैर्य लाभेल.
तथापि, तूळ आणि मिथुन राशीच्या लोकांनी सावध राहणं आवश्यक आहे. त्यांच्या जीवनात अजून काही अडथळे, जबाबदाऱ्या आणि मानसिक दडपण टिकून राहू शकतात. ज्योतिषांच्या मते, शनिचं थेट संक्रमण म्हणजे कर्मांच्या परिणामांचा वेग वाढतो. त्यामुळे या काळात जे परिश्रम, प्रामाणिकपणा आणि संयम पाळतील त्यांना शुभ फळं मिळतील; तर आळशी, निष्काळजी किंवा अन्याय करणाऱ्यांना शनिच्या कठोर परीक्षांना सामोरं जावं लागू शकतं.
टीप- वरील बातमी केवळ वाचकांची आवड लक्षात घेऊन देण्यात येत आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी.