'उम्र मत देखो, आजकल चलता है'...शिक्षिकेचा 'डर्टी गेम'

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Teacher's Dirty Game मुंबईतील एका प्रतिष्ठित आंतरमहाविद्यालयातून आलेली ही घटना समाजाला हादरवणारी आहे. ३८ वर्षीय महिला शिक्षिकेने आपल्या अल्पवयीन विद्यार्थ्याला प्रेम आणि विश्वासाच्या जाळ्यात ओढून वर्षभर त्याचे लैंगिक शोषण केल्याचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या शिक्षिकेला आणि तिला मदत करणाऱ्या एका मैत्रिणीला अटक केली असून, दोघींविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
 

Teacher 
ही धक्कादायक कहाणी सुरू झाली त्या महाविद्यालयाच्या वार्षिक महोत्सवाच्या तयारीपासून. अकरावीत शिकणारा १६ वर्षीय मिहिर (नाव बदललेले) हा एका नृत्यगटाचा भाग होता. सरावादरम्यान त्याच्या कॉलेजमधील शिक्षिका शोमिता (नाव बदललेले) हिचे त्याच्याकडे लक्ष गेले. सुरुवातीला शोमिता मैत्रीपूर्ण वागली, पण हळूहळू तिचे वर्तन बदलत गेले. ती दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने मिहिरला भेटू लागली. मिहिरला हे शिक्षक म्हणून आपुलकीचे लक्षण वाटले, मात्र काही दिवसांतच शोमिताचे खरे इरादे स्पष्ट झाले.
 
एका दिवशी तिने थेट मिहिरसमोर आपली भावना व्यक्त केली, मात्र मिहिरने ठाम नकार दिला. त्यानंतरही शोमिताने हार मानली नाही. तिने मिहिरच्या एका जवळच्या मैत्रिणीच्या माध्यमातून त्याला भावनिकदृष्ट्या प्रभावित करण्याचा डाव आखला. त्या मुलीने मिहिरला समजावले , आजकाल वय काही महत्त्वाचे नाही, मोठ्या महिलेशी नातं ठेवणं अगदी सामान्य आहे. अशा सततच्या बोलण्याने मिहिरच्या मनात गोंधळ निर्माण झाला. हळूहळू मिहिर तिच्या प्रभावाखाली गेला आणि एक दिवस शोमिताने त्याला कॉलेजजवळ बोलावून आपल्या गाडीत बसवले. ती त्याला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेली, जिथे तिने त्याच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्या दिवसानंतर हा प्रकार जवळपास दररोज सुरू राहिला. ती त्याला वर्गानंतर एकांत ठिकाणी नेत असे, काही दिवसांनी तर पंचतारांकित हॉटेल्समध्येही घेऊन जायची. तिथे दारू पाजून, मानसिकदृष्ट्या कमकुवत करून ती त्याचा गैरफायदा घेत असे.
 
वेळ जसजशी पुढे सरकत गेली, मिहिर गुदमरल्यासारखा होऊ लागला. या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा तो प्रयत्न करत असताना, शोमिताने त्याला चिंता कमी करण्याच्या नावाखाली औषधे द्यायला सुरुवात केली. त्याचा मानसिक तोल बिघडत गेला. बारावीच्या परीक्षा जवळ येताच त्याला वाटले की कॉलेज संपल्यावर हे सर्व संपेल पण शोमिता त्याला सोडायला तयार नव्हती. कॉलेज संपल्यानंतरही ती आपल्या घरातील कर्मचाऱ्यांद्वारे किंवा मित्रामार्फत त्याच्याशी संपर्क साधत राहिली. अखेर, मिहिरने धैर्य एकवटले आणि आपल्या पालकांना संपूर्ण सत्य सांगितले. पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. चौकशीत सर्व तपशील समोर आले आणि पोलिसांनी महिला शिक्षिका शोमिता आणि तिच्या साथीदार मैत्रिणीला अटक केली.