तेलंगणात ट्रक आणि बसच्या धडकेत १६ ठार, १० जखमी

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
रंगारेड्डी,
Telangana fatal accident तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी पहाटे झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला असून १० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सायबराबाद पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतल्या चेवेल्ला मंडलमधील खानपूर गेट परिसरात हा अपघात घडला. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी बसला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज एवढा जबरदस्त होता की बसचा पुढचा भाग पूर्णतः चिरडला गेला आणि अनेक प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

Telangana fatal accident
 
 
काही प्रवासी वाहनाच्या आत अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन पथकांनी मदतकार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन पथके आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
 
 
राज्याचे परिवहन मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने मदतकार्य गतीमान करण्याचे आणि जखमींना उच्च प्रतीचे उपचार देण्याचे आदेश दिले. दरम्यान, पोलिसांनी अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ट्रकचालकाचा अतिवेग आणि चुकीच्या दिशेने वाहन चालवणे हे या भीषण अपघातामागचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी अजूनही बचाव आणि सफाईचे काम सुरू असून, परिसरात शोककळा पसरली आहे.