पाकिस्तानमध्ये वाढले अतिरेकी हल्ले...१,१०० हून अधिक जवान, अधिकाऱ्यांचा मृत्यू

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
इस्लामाबाद,
Terrorist attacks increase in Pakistan १९७१ नंतर २०२५ हे वर्ष पाकिस्तानसाठी सर्वाधिक रक्तरंजित आणि अस्थिर ठरत आहे. या वर्षीच्या पहिल्या दहा महिन्यांतच देशातील सुरक्षा यंत्रणा अक्षरशः हादरली असून, आतापर्यंत पाकिस्तानी सैन्य, पोलिस आणि गुप्तचर विभागातील तब्बल १,१०० हून अधिक जवान आणि अधिकारी मृत्यूमुखी पडले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान १९७१च्या युद्धानंतर प्रथमच नोंदवले गेले आहे. सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, केवळ ऑक्टोबर २०२५ महिन्यातच १९५ सुरक्षा कर्मचारी ठार, १०९ गंभीर जखमी झाले असून, आणखी १५ जण बेपत्ता आहेत किंवा ते तालिबान आणि पश्तून दहशतवाद्यांच्या ताब्यात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतांमध्ये एक पोलीस अधीक्षक, एक लेफ्टनंट कर्नल, तीन मेजर, एक जेसीओ आणि एक कॅप्टन यांचा समावेश आहे. याशिवाय, पाकिस्तानच्या एसएसजी (स्पेशल सर्व्हिस ग्रुप) दलातील दोन कमांडोही या संघर्षात मृत्युमुखी पडले आहेत.
 
 
pakistan
 
हा आकडा गेल्या १६ वर्षांतील सर्वाधिक वार्षिक मृत्यू दर ठरला आहे. संरक्षण विश्लेषकांच्या अंदाजानुसार, सैन्य आणि अतिरेक्यांमधील मृत्यूचं प्रमाण सध्या १:१.६ इतकं आहे. म्हणजेच, प्रत्येक अतिरेक्याच्या मृत्यूसाठी जवळपास दोन सैनिकांचे जीव जात आहेत. अशी स्थिती कायम राहिली, तर वर्षाअखेरपर्यंत ही संख्या १,३०० ते १,४०० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, जी सुरुवातीच्या अंदाजापेक्षा खूपच जास्त आहे. बलुचिस्तानमध्ये या वर्षी बीएलए (बलुच लिबरेशन आर्मी) ने प्रचंड हिंसाचार केला आहे, तर टीटीपी (तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान) नेही देशभरात हल्ले तीव्र केले आहेत. गुप्तचर अहवालांनुसार, केवळ वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांतच बलुचिस्तानमध्ये ३७० हून अधिक दहशतवादी हल्ले झाले, ज्यात शेकडो सैनिक, पोलीस आणि नागरिक ठार झाले.
 
 
 
दरम्यान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणावाने नव्या संघर्षाला तोंड फुटलं आहे. पाकिस्तानने अलीकडेच अफगाणिस्तानावर क्षेपणास्त्र हल्ला केला, ज्याला प्रत्युत्तरादाखल अफगाण सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिलं. या संघर्षात ५८ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंधही पुन्हा एकदा ताणले गेले आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केलं. या कारवाईत १३ पाकिस्तानी सैनिक ठार झाले, तर एकूणच ऑपरेशनदरम्यान ५० हून अधिक सैनिकांचा बळी गेला. भारताने ७ मे रोजी ही मोहीम सुरू केली आणि १० मे रोजी युद्धबंदीची घोषणा केली. एकूणच, २०२५ हे वर्ष पाकिस्तानसाठी लष्करी, राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या सर्वात अस्थिर ठरत आहे.