नागपूर
The Art Vault exhibition मुंबई आणि पुणे यांना कला राजधानी मानले जात असले, तरी विदर्भातील सर्जनशीलता शांतपणे फुलत आहे. ‘महाकल्प आर्टिस्ट्स अकॅडमी’तर्फे नागपुरातील चिटणवीस सेंटर येथे आयोजित ‘द आर्ट व्हॉल्ट’ या प्रदर्शनात विदर्भातील ५६ कलाकारांनी आपली कलाकृती सादर केली. हे प्रदर्शन १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान भरविण्यात आले आहे. ‘स्मॉल बट समथिंग’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनाने स्थानिक कलाकारांना आपली कला मांडण्यासाठी व्यासपीठ दिले, तसेच नागपूरकरांना परवडणाऱ्या दरात उत्कृष्ट कलाकृती मिळविण्याची संधी दिली. अकॅडमीचे अध्यक्ष व छायाचित्रकार विजय फरकसे यांनी सांगितले की, "कलाकारांना मोठ्या शहरांप्रमाणेच व्यासपीठ मिळावे, हे आमचे ध्येय आहे. अनेक विदर्भातील कलाकारांच्या कलाकृतींसाठी मुंबईतील गॅलरीत प्रतीक्षा यादी असते. आम्ही तोच दर्जा नागपुरात आणू इच्छितो.” त्यांनी रामटेक येथे १५ एकरांवर कला कॅम्पस उभारण्याची घोषणाही केली.
विदर्भाची प्रतिमा...
चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आर्ट निर्देशक नाना मिसळ यांनी निळ्या रंगावर आधारित संग्रह सादर केला. विदर्भात प्रतिभा आहे, फक्त व्यासपीठाची गरज आहे. नव्या पिढीतील कलाकार आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत, ही सकारात्मक बाब असल्याचे मिसळ यांनी सांगितले. ज्येष्ठ चित्रकार नंदकिशोर मकर यांनी म्हटले की, “अॅबस्ट्रॅक्ट आर्टला पटकथेची गरज नसते. ती भावना आणि स्वरूपातून उलगडते.
या विविधतेतून विदर्भातील आधुनिक कला दृष्टी स्पष्ट होते.” तर तरुण कलाकारांमध्ये शिवानी भावसार हिने ‘इको-प्रिंट’ तंत्र वापरून निसर्गाचे प्रतिबिंब दाखवले. अदिती मराठेने भावनांवर आधारित अॅबस्ट्रॅक्ट चित्रे सादर केली, तर सदानंद चौधरीने ग्रामीण जीवन आणि पोळा सणावर आधारित चित्रांनी आकर्षण निर्माण केले. सुमारे १०० हून अधिक चित्रे व छायाचित्रांनी सजलेले ‘द आर्ट व्हॉल्ट’ प्रदर्शन नागपूरच्या कलासंवेदनांना नवा साज देत, विदर्भात सृजनाची नवी चाहूल निर्माण करत आहे.