अमरावती, 
navneet rana भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा बॉम्बने टाकून ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांच्या मुलीवरही आक्षेपार्ह टिका करण्यात आली आहे. हैदराबाद येथील अब्दुल नावाच्या व्यक्तीकडून स्पीड पोस्टद्वारे हे धमकीचे पत्र नवनीत यांच्या अमरावती येथील शंकर नगर निवासस्थानी आले आहे. आठवड्याभरात ही दुसरी धमकी आहे. वारंवार येणार्या धमक्यांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
 
  
 
नवनीत यांचे खासगी स्वीय सहाय्यक मंगेश कोकाटे यांनी २ नोव्हेंबरला राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राजापेठ पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ३० ऑक्टोबर रोजी स्पीड पोस्टद्वारे एक पांढरा बंद लिफाफा नवनीत यांच्याकडे प्राप्त झाला. तो लिफाफा २ नोव्हेंबरला उघडून पाहिल्यानंतर हे पत्र अब्दूल नावाच्या व्यक्तीने हैदराबाद येथून पाठवल्याचे स्पष्ट झाले. पत्रातील मजकूर धमकीचा असून नवनीत राणा यांना अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. ठार मारण्याची धमकी देतानाच त्यांच्या मुलीवरही टिका करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. धमकी देणार्या अब्दुलने आपला मोबाईलनंबर पत्रात लिहला आहे. यापूर्वीसुद्धा नवनीत राणा यांना अशाच प्रकारची दोन पत्रे प्राप्त झाली होती. त्या दोन्ही पत्रांमधील भाषाशैली आणि मजकूर सध्याच्या पत्रासारखाच आहे. त्यामुळे मागील दोन पत्रे पाठवणारी आणि हे पत्र पाठवणारी व्यक्ती एकच असल्याचा आम्हाला ठाम संशय आहे, असे तक्रारीत कोकाटे यांनी नमुद केले आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांना धमकीची रिल पाठविण्यात आली होती. आता २८ ऑक्टोबरला जावेद नावाच्या व्यक्तीचे धमकीचे पत्र आले होते.navneet rana त्यातही आक्षेपार्ह शब्दांत धमकी देण्यात आली होती. नवीन प्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी पत्र जप्त केले आहे. पोस्टातून प्राप्त माहिती व मोबाईल नंबर या अधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
नवनीत नागपुरच्या रुग्णालयात दाखल
लोकसभा निवडणुकी नवनीत राणा यांच्या पाय फ्रँक्चर झाला होता. आता परत त्यांच्या त्याच पायाला एक लहान गाठ झालेली आहे. त्यांना अमरावती येथील ऑर्थोपॅडिक सर्जन डॉ. शाम राठी यांच्या सल्ल्यानुसार सुयोग हॉस्पिटल नरेंद्र नगर, नागपुर येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पायावर ऑर्थोपॅडिक सर्जन डॉ. गिरीश मोटवानी शस्त्रक्रिया करणार आहे. नवनीत यांच्यासोबत आ. रवि राणा आहेत. डॉक्टरांनी त्यांना पुढील २५ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.