बीजिंग,
Will China attack Taiwan? चीनकडून सातत्याने वाढवली जात असलेली लष्करी शक्ती आता जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरली आहे. तज्ञांच्या मते, चीन ही वाढती शक्ती सर्वप्रथम तैवानविरुद्ध वापरू शकतो. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग वारंवार स्पष्टपणे सांगतात की तैवान हा चीनचा अविभाज्य भाग आहे आणि कोणत्याही परिस्थितीत त्यावर चीनचा ताबा मिळवला जाईल. अशा पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तैवानविषयी विचारण्यात आलेला प्रश्न आणि त्यावर त्यांनी दिलेले उत्तर विशेष लक्षवेधी ठरले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सीबीएसच्या “60 मिनिट्स” या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, शी जिनपिंग यांनी मला स्पष्टपणे सांगितले आहे, आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान हे स्पष्ट केले आहे की, ‘जोपर्यंत ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, तोपर्यंत चीन तैवानविरुद्ध कोणतीही लष्करी कारवाई करणार नाही. कारण त्यांना त्याचे परिणाम माहीत आहेत.’
तथापि, ट्रम्प यांनी या प्रश्नाचे थेट उत्तर देण्यास टाळाटाळ केली की, “जर चीनने तैवानवर हल्ला केला, तर अमेरिका तैवानच्या बचावासाठी सैन्य पाठवेल का?” अलीकडेच ट्रम्प यांनी दक्षिण कोरियात शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. या बैठकीदरम्यान तैवानचा मुद्दा उपस्थित न झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “या भेटीचा केंद्रबिंदू अमेरिका-चीन व्यापार तणाव हा होता,” असे ट्रम्प म्हणाले. त्यांनी पुढे विश्वास व्यक्त केला की, त्यांच्या कार्यकाळात चीन तैवानविरुद्ध कोणतेही आक्रमक पाऊल उचलणार नाही.
तैवान स्वतःला स्वतंत्र आणि लोकशाही तत्त्वांवर चालणारा देश मानतो. मात्र, चीन तैवानला आपला अविभाज्य भूभाग असल्याचा दावा करतो. या वादामुळे जगातील फारच कमी देश तैवानला औपचारिक मान्यता देतात. अमेरिकन संरक्षण अधिकाऱ्यांनी यापूर्वीही वारंवार इशारा दिला आहे की चीन तैवानविरुद्ध सैन्याचा वापर करू शकतो आणि अशा घडामोडींनी आशिया-प्रशांत क्षेत्रात तणाव आणखी वाढू शकतो.