४० कोटींचं आयसीसीचं बक्षीस, तर बीसीसीआयचा ५१ कोटींचा बोनस!

भारतीय महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Women's team showered with awards भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ च्या एकदिवसीय विश्वचषकात अविस्मरणीय कामगिरी करत इतिहास रचला आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे.
 
Women
 
भारतीय संघाच्या या विजयावर बक्षिसांचा अक्षरशः वर्षाव होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिला संघ आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी तब्बल ₹५१ कोटींच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी ही घोषणा करताना सांगितले की, हा विजय फक्त एक ट्रॉफीचा नाही, तर भारतातील महिला क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात आहे.
 
सैकिया पुढे म्हणाले, १९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखालीपुरुष संघाने जसे भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिली, तसेच आता हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने महिला क्रिकेटला नवी ऊर्जा दिली आहे. त्यांनी फक्त विश्वचषक जिंकला नाही, तर देशवासीयांची मनेही जिंकली आहेत. त्यांनी आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी सचिव तसेच सध्याचे आयसीसी अध्यक्ष जय शाह यांचेही विशेष आभार मानले. सैकिया म्हणाले, जय शाह यांच्या नेतृत्वाखाली महिला क्रिकेटमध्ये अनेक क्रांतिकारी बदल झाले. महिला क्रिकेटपटूंना पुरुष खेळाडूंप्रमाणे समान वेतन देण्याचा निर्णय, तसेच बक्षीस रकमेतील वाढ या गोष्टींनी महिला क्रिकेटला मोठी चालना मिळाली आहे.
 
महिला विश्वचषकासाठी यावर्षी बक्षीस रक्कम तब्बल ३०० टक्क्यांनी वाढवून ३.८८ दशलक्ष डॉलर्सवरून जवळपास १४ दशलक्ष डॉलर्सपर्यंत नेण्यात आली आहे. भारताला आयसीसीकडून जेतेपदासाठी ४.४८ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ₹४० कोटी रुपये) इतकी बक्षीस रक्कम मिळाली, जी महिला क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक आहे. २०२५ च्या महिला विश्वचषकासाठी आयसीसीने एकूण १३.८८ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ₹१२३ कोटी रुपये) बक्षीस रक्कम जाहीर केली होती, जी २०२२ च्या स्पर्धेच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. या भव्य घोषणेमुळे भारतीय महिला क्रिकेटपटूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, देशातील तरुणींना क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी हा विजय आणि बीसीसीआयचा सन्मान हे दोन्ही टप्पे ऐतिहासिक ठरत आहेत.