यवतमाळ,
Bhau-Beej डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, यवतमाळ यांच्या सेवा विभागाच्या माध्यमातून भाऊबीज या पारंपरिक सणानिमित्त दोन ठिकाणी सामाजिक आणि संस्कारमूल्ये जपणारे कार्यक्रम उत्साहात पार पडले. 26 ऑक्टोबर 2025 रोजी वंजारी फैल येथील संस्कार केंद्रात भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विनोद वडे (नगर समरसता प्रमुख), अतुल राऊत (जिल्हा सेवाटोळी सदस्य), आशिष विंचूरकर (जिल्हा सेवाप्रमुख) आणि पूजा सागळे (शिक्षिका) यांची उपस्थिती लाभली. वस्तीतील मातृशक्ती व लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. कार्यक्रमात भावा-बहिणींच्या प्रेमबंधांना उजाळा देत सर्वांनी संस्कारमय वातावरणात एकत्र सण साजरा केला.
यानंतर 1 नोव्हेंबर 2025 रोजी अहिल्यादेवी बालसंस्कार केंद्र, भाग्य नगर, डोर्ली येथे भाऊबीज कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी सुनील मेहेर (प्रांत सेवाप्रमुख), विनोद बडोद (भाग कार्यवाह), आशिष विंचूरकर (जिल्हा सेवा प्रमुख) आणि श्रेया डफाळ उपस्थित होते. वस्तीतील मुले व पालकांनी एकत्रित सहभाग नोंदवला. मुलांनी घरून सजवलेली पूजेची ताटे आणून पारंपरिक पद्धतीने भावंडांना ओवाळले.
दोन्ही कार्यक्रमांत मुलांमध्ये संस्कार, स्नेहभाव आणि सामाजिक जाणीवा दृढ करण्याचा उद्देश साध्य झाला. पाहुण्यांनी सेवा विभागाच्या कार्याची प्रशंसा करत अशा उपक्रमांद्वारे समाजात मूल्याधिष्ठित संस्कार रुजवण्याचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.