तभा वृत्तसेवा
पुसद,
babasaheb-naik-spinning-mill : विदर्भातील सुरू असलेल्या मोजक्या सूतगिरणीपैकी मागील 35 वर्षांपासून नियमित सुरू असलेली बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी पिंपळगाव (कान्हा) कामगाराअभावी अडचणीत आल्याची खंत अध्यक्ष श्याम पाटील यांनी व्यक्त केली.
कामगारांचा कल हा शहरी भागाकडे वळल्याने सूतगिरणीमधील बहुतांश कामगार काम सोडुन गेले आहेत. जे कामगार कामावर आहेत त्यांचे अनुपस्थितीचे प्रमाण अधिक आहे. याकरीता संस्थेच्या संचालकांकडून वेळोवेळी कामगारांच्या गावामध्ये जाऊन त्यांना प्रोत्साहीत करणे सुरू आहे.
वेळोवेळी जाहीराती व कामगार मेळाव्याचे आयोजन करून कामगारांच्या उपस्थितीत वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. याशिवाय पुसद व महागाव या ठिकाणावरुन वाहतुकीकरीता सूत गिरणीकडून वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु हवा तसा प्रतिसाद कामगार वर्गाकडून न मिळाल्यामुळे काही एजन्सीमार्फत बाहेरील राज्यातून कामगार आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
स्थानिक कामगारांना एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध असतानासुद्धा स्थानिक कामगारांचा कल हा पुण्या मुंबईकडे जास्त आहे. सूत गिरणीमध्ये आज प्रतिजोडपे प्रती महिना 25 ते 30 हजार रुपये मिळत असतानाही मागील 4 वर्षात कामगार संख्येत वाढ न झाल्याने दैनंदीन चात्यांचा वापर 50 टक्क्यावर जाऊ शकला नाही. परिणामी कामगारांच्या अनुपस्थितीमुळे संस्थेच्या तोट्यात सातत्याने वाढ झाली आहे. शासनाकडून सूतगिरण्यांना मदतीची केवळ घोषणा केली जाते. मात्र प्रत्यक्ष काहीच मदत होत नसल्याची खंतही श्याम पाटील यांनी व्यक्त केली.
दैनंदिन 2 ते 3 लाख रुपयांच्या नुकसानीचा दावा
प्रसिद्धी पत्रकातून केलेल्या दाव्यात सूतगिरणीकडील 26 हजार 500 चात्याच्या 16 मशिनपैकी 8 ते 10 मशीन सुरू आहेत. त्या माध्यमातून सरासरी 5 ते 6 हजार किलो सूत उत्पादन होत आहे. सूतगिरणीची क्षमता प्रतीदिवस 12 ते 14 हजार किलो सूत उत्पादनाची आहे. त्यामुळे कामगारांअभावी सूतगिरणीला मागील 2 ते 3 वर्षांपासून प्रतीदिवस सरासरी 2 ते 3 लाख रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.