बाराबंकी,
Barabanki truck-car accident बाराबंकी जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबातील सर्व आठ जणांचा मृत्यू झाला. देवा–फतेहपूर महामार्गावर कल्याणी नदीच्या पुलाजवळ भरधाव ट्रक आणि कारची भीषण टक्कर होऊन क्षणात सर्व काही उद्ध्वस्त झाले. या धडकेत कारचे चक्काचूर झाले असून मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फतेहपूरमधील मौलवीगंज परिसरातील रहिवासी प्रदीप रस्तोगी (५५) हे आपल्या कुटुंबासह कानपूरजवळील बिठूर येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपवून रात्री ते भाजप नेते गिरधर गोपाल यांच्या नव्या एर्टिगा कारने परतत होते. कार कल्याणी नदीच्या पुलाजवळ पोहोचताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका वेगवान ट्रकने जोरदार धडक दिली.
धडकेचा आवाज इतका प्रचंड होता की, आसपासच्या गावांतील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. कारचा पुढचा भाग पूर्णपणे चिरडला गेला होता. कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना गॅस कटरचा वापर करावा लागला. पहाटेपर्यंत बचावकार्य सुरूच होते. या अपघातात प्रदीप रस्तोगी, पत्नी माधुरी (५२), मुलगा नितीन (३५), मुलगा कृष्णा (१५), चालक श्रीकांत (४०), महेंद्र मिश्रा उर्फ बाला (४५) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इंद्रकुमार मिश्रा (५०) आणि विष्णू नाग (१५) यांना गंभीर अवस्थेत केजीएमयू ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, ट्रकचा वेग इतका प्रचंड होता की चालकाला ब्रेक लावूनही गाडी नियंत्रणात आणता आली नाही. धडक झाल्यानंतर ट्रक काही मीटरपर्यंत कारला ओढत नेत राहिला. अपघातानंतर चालक ट्रक सोडून फरार झाला असून पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे. एसपी अर्पित विजयवर्गीय यांनी सांगितले की, सर्व मृतांची ओळख पटली असून त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आले आहे.