अ‍ॅग्रोव्हिजनचे राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते भूमिपूजन

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
नागपूर,
agrovision राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारतीच्या मागील परिसरात 21 ते 24 नोव्हेंबर 16 वे अ‍ॅग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, कार्यशाळा, परिषद होणार असून त्या स्थळाचे भूमिपूजन राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते झाले. अ‍ॅग्रोव्हिजन हे शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धती व संशोधनाची माहिती मिळविण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे. सर्व शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन शिकावे, नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा व आपल्या शेतीत त्याचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले.
 
 
 
agrovision
 
अ‍ॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, आयोजन सचिव रवि बोरटकर, रमेश मानकर, माफसूचे कुलगुरू नितीन पाटील, अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशन सदस्य सुधीर दिवे, विजय जाधव, कॅप्टन एल. बी. कलंत्री, समय बनसोड, डॉ. सुनील साहतपुरे, मनोज जवंजाळ, आनंदबाबू कदम, राम मुंजे, डॉ. हितेंद्र सिंह, नितीन कुलकर्णी, प्रशांत वासाडे, पीकेव्हीचे विजय इलोरकर, विनोद राऊत व परिणीता फुके, वैशाली रेवतकर, वर्षा ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. रवि बोरटकर यांनी सांगितले की, या वर्षी 12 हजार चौरस मीटर क्षेत्रात प्रदर्शनाचे हँगर्स, मोठ्या यंत्रांसाठी स्टॉल्स उभारले जातील. कार्यशाळांसाठी तीन, परिषदेसाठी एक हॉल राहील. सुमारे 450 हून अधिक नामांकित कंपन्या व कृषी संस्थांचा यावर्षी सहभाग आहे.
एमएसएमई व नवोन्मेषक यांच्यासाठी स्वतंत्र पॅव्हेलियन तयार करण्यात येणार असून, यात सवलतीच्या दरात स्टॉल्स आहेत. एमएसएमईसाठी येत्या 10 नोव्हेंबरपर्यंत स्टॉल बुकिंग करता येईल. अ‍ॅग्रोव्हिजन 2025 मध्ये शेतकऱ्यांसाठी ऊस उत्पादन, दुग्ध व्यवसाय, शेतकरी उत्पादक संघटना, शेतीत एआय व मशिन लर्निंगचा वापर, विविध विषयांवरील दीर्घकालीन कार्यशाळा आयोजित
करण्यात येणार आहेत. इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर कार्यशाळा होणार आहेत.agrovision सुमारे 60 कृषितज्ञ शेतकऱ्यांना, मार्गदर्शन करतील. मध्य भारतात अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठ्या संधी आहेत. या विषयी माहिती देण्यासाठी अन्न उद्योग प्रक्रिया उद्योगावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अ‍ॅग्रोव्हिजनमध्ये सहभागी होण्यासाठी व प्रदर्शनाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अ‍ॅग्रोव्हिजन सचिवालय, गोविंद अपार्टमेंट, शंकरनगर, नागपूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.