पोलिसांच्या मदतीने भिक्षा मागणाऱ्या 11 बालकांची केली सुटका

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
नागपूर, 
Big Taj Bagh area news मोठा ताजबाग परिसरात लहान मुलांच्या हातात भिक्षेचे पात्र देऊन त्यांना भीक मागण्यास भाग पाडण्यात येत होते. या प्रकारावर कारवाई करत जिल्हा बाल संरक्षण मंचच्या पथकाने 11 बाल भिक्षेकरींची त्यांच्या तावडीतून सुटका केली. ताजबाग येथे रात्री साडे आकराच्या सुमारास मंचने गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाच्या सहकार्याने ही कारवाई केली. मुलांना भिक्षेला जुंपले जात असल्याची तक्रार हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टने मंचकडे केली होती. त्यानुसार महिला व बालविकास विभाग आणि पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली. त्यामुळे धार्मिक स्थळांवर अल्पवयीन मुलांकडून भीक मागवणाèया टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
 
 

Big Taj Bagh area news 
 
हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टने चाइल्ड हेल्पलाईनवर आधी संपर्क साधला होता. त्याची लेखी तक्रार प्राप्त होताच, रविवारी रात्री जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी तातडीने सामाजिक सुरक्षा विभागाशी समन्वय साधला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित बाल संरक्षण पथक तयार करण्यात आले. पथकाने रात्री साडे आकरा वाजता छापा टाकला. या वेळी 6 ते 13 वर्षे वयोगटातील अनेक अल्पवयीन मुले भीक मागताना आढळली. कारवाई दरम्यान काही व्यक्तींनी मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, पथकाला 11 बालभिक्षेकरींची सुटका करण्यात यश आले. या संदर्भात महिला भिक्षेकरीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
 
 
मुलांना वैद्यकीय मदत
सुटका केलेल्या सर्व मुलांची तत्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांना काळजी आणि संरक्षणासाठी बालगृहात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. या घटनेबद्दल सक्करदरा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदविण्यात आली आहे. या कारवाईसाठी सामाजिक सुरक्षा विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नारनवरे, चाईल्ड हेल्पलाईन प्रतिनिधी अनिकेत भिवगडे, मीनाक्षी धडाडे, पूजा कांबळे, रोशन मंडपे, विक्की डहारे , सचिन धोतरकर ङ्खग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या अश्विनी चौर, गगन भरारी बहुउद्देशीय संस्थाङ्ख अध्यक्ष वर्षा पाटील , वंदना राऊत आणि प्रियांका होटे, बरखा सोंगले यांनी मदत केली.
 
 
अल्पसंख्याक आयोगाकडून दखल
ताजबाग परिसरातून सोडवलेल्या बाल भिक्षेकरींची माहिती मिळताच, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली. आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी राज्यातील सर्व धार्मिक स्थळांवर बालभिक्षेकरी व मानवी तस्करी रोखण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जारी केले.